जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांना जिल्हा बँक पूर्ण सहकार्य देईल : मनिष दळवी

72 वा अखिल भारतीय सहकारी सप्ताह उत्साहात
Edited by: दिपेश परब
Published on: November 19, 2025 19:47 PM
views 19  views

वेंगुर्ले :  सहकारी संस्थांमध्ये कार्यरत सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रामाणिकपणा व पारदर्शकतेने काम करून संस्थेची प्रगती साधावी, तसेच जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांना जिल्हा बँक पूर्ण सहकार्य देईल, असे आश्वासन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी मठ येथे दिले. सहकार क्षेत्रातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी नियमित प्रशिक्षण घेणे काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले. 

७२ व्या अखिल भारतीय सहकारी सप्ताहानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. आणि सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ यांच्या वतीने जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याच अनुषंगाने श्री. स्वयंमेश्वर विकास सेवा संस्था लि. मठ येथे सहकार मेळाव्याचे आयोजन उत्साहात पार पडले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी तर उद्घाटक म्हणून सहकार अधिकारी श्रेणी–1 वेंगुर्ला आर. टी. चौगुले उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष गजानन सावंत, संचालक एम. के. गावडे, वेंगुर्ला खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर केळजी, माजी सरपंच महेश सामंत व जिल्हा सहकारी बोर्डाचे माजी संचालक रमण वायंगणकर उपस्थित होते.

उद्घाटनपर भाषणात आर. टी. चौगुले यांनी तरुणांनी सहकार क्षेत्रात सहभागी होऊन रोजगार निर्मितीस हातभार लावावा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पादन वाढवावे तसेच ग्रामविकासासाठी सहकाराचे महत्व जाणून गावांना आर्थिक बळकटी द्यावी, असे आवाहन केले. महेश सामंत यांनी कोकणातील निसर्गाचा उपयोग करून कृषी पर्यटनाला चालना देण्याची गरज व्यक्त केली तर एम. के. गावडे यांनी सहकार वाढीसाठी आवश्यक प्रयत्नांवर मार्गदर्शन केले.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सहकार बोर्डाचे विकास अधिकारी मंगेश पांचाळ यांनी केले. श्री स्वयंमेश्वर विकास सेवा संस्था लि., मठ चे अध्यक्ष श्री. सुभाष बोवलेकर यांनी कार्यक्रमासाठी सभागृह उपलब्ध करून देत सहकार्य केले. वेंगुर्ला तालुक्यातील विविध विकास संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.