
चिपळूण : सह्याद्रि शिक्षण संस्थेचे वसंत शंकर देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,असुर्डे - आंबतखोल या विद्यालयात गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना विद्यालयाचा माजी विद्यार्थी स्वप्नील जाधव यांच्या सौजन्याने प्राप्त झालेल्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमासाठी सह्याद्रि शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक मा.शांताराम खानविलकर,सेक्रेटरी मा.महेशजी महाडिक,शालेय समितीचे ज्येष्ठ सदस्य शंकर खापरे, यशवंत भागडे,रघुनाथ राऊत,असुर्डे गावचे सरपंच पंकज साळवी, सामाजिक कार्यकर्ते निलेश खापरे, शिक्षण प्रेमी मनोहर पाष्टे,दाजी खापरे,गणपत खापरे इ. मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.मान्यवरांच्या शुभ हस्ते जवळजवळ 150 विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, दप्तर,वह्या,कंपास बॉक्स इत्यादी शैक्षणिक साहित्याचे याप्रसंगी वितरण करण्यात आले. हे साहित्य मिळविण्यासाठी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक डी डी फुटक व विद्यमान मुख्याध्यापक अमर भाट यांनी प्रयत्न केले.
याप्रसंगी बोलताना मा. खानविलकर सर यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक,भौतिक प्रगती व गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानातील उल्लेखनीय यशाबद्दल त्यांनी विद्यालयाचे अभिनंदन केले. विद्यालयातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य देणारा विद्यालयाचा माजी विद्यार्थी स्वप्निल जाधव याचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.
ते म्हणाले की, या विद्यालयाचा माजी विद्यार्थी एवढे साहित्य देऊ शकतो कारण त्याच्या अंगी कृतज्ञता आहे. या गोष्टींचा विद्यार्थ्यांनी विचार करावा. मिळालेल्या शैक्षणिक साहित्याचा योग्य वापर करावा व शैक्षणिक प्रगती साधावी. ज्या ठिकाणी आपले भविष्य घडविले जात आहे त्या संस्थेचे, त्या शाळेचे, दानशूर दात्यांचे उपकार कायम स्मरणात ठेवावेत. चांगला अभ्यास करून उत्तरोत्तर प्रगती साधावी व आपले भविष्य घडवावे असे आवाहन विदयार्थ्यांना केले.
मुख्याध्यापक अमर भाट यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यालयाच्या शालेय,सहशालेय व शालाबाह्य उपक्रमांची माहिती दिली.विद्यालयाने निर्माण केलेल्या भौतिक सुविधांची सद्यस्थिती याबाबत माहिती सांगितली.यावेळी त्यांनी चालू शैक्षणिक वर्षी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केल्या जाणाऱ्या उपक्रमांची व उपाययोजनांची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी असुर्डे,आंबतखोल, कुशिवडे पंचक्रोशीतील पालक,ग्रामस्थ,शिक्षण प्रेमी, विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.अश्मी कोचीरकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले तर विराज सावंत यांनी सर्वांचे आभार मानले.