सावर्डे विद्यालयात 1980 वह्यांचे वाटप

शिक्षण समाज परिवर्तनाचे माध्यम : शशिकांत पावसकर
Edited by: मनोज पवार
Published on: June 18, 2025 11:25 AM
views 166  views

सावर्डे : शिक्षण घेताना कोकणातील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे अनेक संकटांना सामोरे जावे लागते ही वास्तवता लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासत गेली पंधरा वर्षे हा उपक्रम राबवत असून याचा कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. समाज परिवर्तनासाठी प्रत्येक कुटुंबातील मुल शिकणे आवश्यक आहे त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया असे आवाहन दानशूर शिक्षण प्रेमी शशिकांत पावसकर यांनी याप्रसंगी केले.

ज्या समस्यांना स्वतःला सामोरे जावे लागले अशा समस्यांना समाजातील विद्यार्थ्यांना सामोरे जाण्याची वेळ येऊ नये या उपकृत भावनेने सेवानिवृत्त आरटीओ ऑफिसर रत्नागिरीतील पावस गावचे रहिवासी शशिकांत पावसकर, उद्योजक दिपक कोलवणकर व राकेश सावर्डेकर यांनी सावर्डे विद्यालयातील होतकरू व अभ्यासू विद्यार्थ्यांना सुमारे 1लाख 20 हजार रुपयांच्या 1980 लाँग नोटबुक वह्यांचे वाटप केले याचा लाभ विद्यालयातील ग्रामीण भागातून येणाऱ्या 330 विद्यार्थ्यांनी घेतला. याप्रसंगी शिक्षण प्रेमी शशिकांत पावसकर, दीपक कोलवणकर, राकेश सावर्डेकर, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर,पालक,ग्रामस्थ,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. शालेय वस्तू वेळेत प्राप्त झाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उसांडून वाहत होता.

प्रास्ताविकात विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांनी मिळालेल्या शैक्षणिक साहित्याचा योग्य वापर करून आपण त्यांचा हेतू पूर्णत्वास घेऊन जाण्याचे आवाहन केले.अशा शिक्षण प्रेमी व दानशूर व्यक्तींच्या या उपक्रमामागील हेतूचा विचार करून इतरांना सहकार्य करण्याचा गुण जोपासावा असे सांगितले. शेवटी प्रेरणा कदम यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

 शालेय वह्या स्वीकारताना विद्यार्थी तसेच वह्यांचे  वाटप करताना शिक्षण प्रेमी शशिकांत पावसकर,  दीपक कोळवणकर व मान्यवर