
दोडामार्ग : तृणधान्याच्या आहारातील वापराने कॉलेस्टरॉल, ब्लड प्रेशर, लठ्ठपणा, मधुमेह व कॅन्सर यांसारख्या आजारांवर मात करता येते. त्यामुळे आपल्या दैनंदिन आहारामध्ये तृणधान्यांचा वापर अवश्य करा, असा सल्ला झोळंबे उपकेंद्राच्या डॉ. निकिता नाईक यांनी उपस्थितांना दिला.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा झोळंबे येथे तृणधान्य जागरुकता व प्रदर्शन कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला झोळंबे सरपंच विशाखा नाईक, उपसरपंच विनायक गाडगीळ, माजी सरपंच राजेश गवस, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा साक्षी परब, मुख्याध्यापक प्रविण देसाई , ग्रामपंचायत सदस्य संजना गवस, उज्वला कांबळे, शिक्षक संतोष गवस, शीतल गवस, देवेंद्र भैरवकर, तसेच सर्व विद्यार्थी , माता पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी राजेश गवस, विशाखा नाईक , विनायक गाडगीळ, साक्षी परब यांनी आहाराचे महत्त्व आपल्या मनोगतातून पटवून दिले. राऊळ आजींनी आज लुप्त झालेल्या कांग, पाखड या धान्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
विद्यार्थ्यांनी शिक्षिका श्रीम. शीतल गवस यांच्या मार्गदर्शना खाली तृणधान्यांच्या मदतीने आकर्षक रांगोळी काढून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तांदूळ, गहू , मका, नाचणी, ज्वारी, बाजरी, वरी, जवस या तृणधांन्यांचा वापर रांगोळी काढण्यासाठी केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व माता पालकांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रविण देसाई यांनी केले. सुत्रसंचलन व आभार संतोष गवस यांनी मानले.