
सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए सरकारच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेत हॅट्रिक केली. महाराष्ट्रातून नितिन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, प्रतापराव जाधव यांनी मंत्रीपदांची शपथ घेतली. मात्र, महाराष्ट्रात महायुतीचा बोलबाला ज्या कोकणानं राखला त्या कोकणपट्टीला मंत्री पदापासून वंचित राहण्याची नामुष्की ओढवली आहे.
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर हे कोकण किनारपट्टीचे जिल्हे म्हणजे शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला असं चित्र होतं. शिवसेना पक्षाचे पारंपरिक मतदार संघ म्हणून या मतदारसंघांकडं पाहिलं जात होतं. मात्र, या निवडणुकीत हे चित्र पूर्णतः बदलल्याचं पाहायला मिळालं. कोकणातील केवळ एक भिवंडीची जागा वगळता सर्व जागा महायुतीच्या पारड्यात गेल्या आहेत. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमधील एकूण सहा जागांपैकी पाच जागा महायुतीनं मिळवल्या. महाराष्ट्रात नाकातोंडावर आपटलेल्या महायुतीचा केवळ कोकणात बोलबाला होता. मात्र, या कोकणच्या वाट्याला केंद्रीय मंत्रीपद, राज्यमंत्रीपद आलेलं नाही. त्यामुळे कोकण मंत्रीपदापासून सध्यातरी वंचित आहे. रत्नागिरीत सिंधुदुर्गतून नारायण राणे, रायगड मधून सुनिल तटकरे, ठाणे नरेश म्हस्के , कल्याण श्रीकांत शिंदे व पालघर मधून डॉ. हेमंत सावरा महायुतीचे खासदार निवडून आलेत. भिवंडी वगळता कोकण पट्ट्यात महायुतीला यश मिळाले आहे.
मागच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री असणारे भाजप नेते नारायण राणे यांना यावेळी शपथ देण्यात आली नाही. राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरेंसारखा नेता अंतर्गत राजकाणाचा बळी पडला. कल्याणमधून हॅट्रिक करणाऱ्या श्रीकांत शिंदेंनी शिवसैनिकाला संधी दिली. त्यामुळे कोकणच्या पदरी घोर निराशा पडली. एनडीएच्या मंत्रीमंडळातून कोकण वंचित राहिले आहे. त्यामुळे आगामी मंत्रीमंडळ विस्तारात कोकणच्या पदरी चांगलं मंत्रीपद मिळेल या आशेवर आता कोकणी जनता आहे.