'त्या' कामांसाठी निधी देऊन नागरिकांची गैरसोय दूर करा

आप्पा लुडबे यांची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 04, 2022 15:57 PM
views 230  views

मालवण : मालवण नगर परिषद हद्दीतील देऊळवाडा स्मशान भूमी नूतनीकरण करणे व शेड बांधकाम करणे. तसेच वायरी अंबाजी शाळेजवळ मेस्त्री वाडी येथील परुळेकर घरापर्यंत आर सी सी गटर व काँक्रिट रस्ता बांधकाम करणे. या कामासाठी जिल्हा नियोजन मधून निधी मिळावा अशी मागणी माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली. 


मालवण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, माझ्या प्रभागातील असलेल्या एकमेव स्मशानाची शेड ही मागील तीन वर्षापासून स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत असून केव्हाही पडून अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. मागील काही वर्ष या कामासाठी डी. पी. डी. सी. तून निधीची मागणी करूनही या कामासाठी निधी मिळालेली नाही त्यामुळे हे काम होऊ शकलेले नाही.


तसेच वायरी प्रभागातील शहराच्या हद्दीलगत पावसाळी पाण्यासाठी व्हाळी कमरोड करण्यासाठी मागील तीन वर्षापासून सतत पाठपुरावा करत आहे परंतु या कामासाठीही निधी मिळत नाही. हे काम न झाल्याने वायरी चव्हाण वाडी, लुडबे वाडीतील अनेक घरात पावसाळी पाणी घुसून मालमत्तेची हानी होते. दोन्ही कामाना तांत्रिक मंजुरी घेतलेली आहे. त्यामुळे या दोन्ही कामांसाठी निधी उपलब्ध करून माझ्या प्रवर्गातील जनतेची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी लुडबे यांनी पालकमंत्री चव्हाण यांच्याकडे केली आहे.