LIVE UPDATES

कणकवली महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी थेट प्रवेश

स्पर्धा परीक्षांची स्वतंत्र बॅच, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 04, 2025 13:46 PM
views 251  views

कणकवली : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला, वाणिज्य,  विज्ञान, संगणक शास्त्र, अकाउंट ॲन्ड फायनान्स वर्गासाठी मुंबई विद्यापीठाने प्रवेश प्रक्रिया जाहीर केली असून कणकवली महाविद्यालयात  प्रथम वर्ष कला, वाणिज्य, विज्ञान, संगणक शास्त्र आणि बॅफ या वर्गासाठी प्रवेश पूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी विनाशुल्क केली जात आहे. प्रथम वर्ष कला व विज्ञान या वर्गासाठी ' मागेल त्याला प्रवेश' हे धोरण महाविद्यालयाने स्वीकारले असून कला प्रथम वर्षासाठी थेट प्रवेशाची सोय कणकवली महाविद्यालयाने केली आहे.

कणकवली महाविद्यालय हे सातत्यपूर्ण गुणवत्ता राखणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिले आदर्श महाविद्यालय ठरले असून राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन परिषदेने ' ए ,ग्रेड दर्जा बहाल करून कणकवली महाविद्यालयाला मानांकित केले आहे.

कणकवली महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरणानुसार रोजगाराभिमुख विषयाची निवड करण्याची संधी असून कला, साहित्य, वाणिज्य, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, या विविध क्षेत्रात अष्टपैलू विद्यार्थी घडविण्यासाठी महाविद्यालयात विविध उपक्रम राबवले जातात.

विद्यार्थ्यांना पदवीबरोबरच स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळावे या दृष्टिकोनातून कणकवली महाविद्यालयात प्रथम वर्ष पदवीच्या प्रथम वर्षापासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र बॅच तयार केली असून या बॅचमध्ये प्रथम वर्षाच्या निवडक व इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, नोकर भरती व कौशल विकास केंद्र, करिअर कट्टा,सांस्कृतिक विभाग, जिमखाना विभाग,राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, आजीवन अध्ययन व विस्तार शिक्षण, सायन्स असोसिएशन, लँग्वेज असोसिएशन, सोशल सायन्स फोरम, महिला विकास कक्ष, कनक विशेषांक या विविध विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासासाठी सातत्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. 

त्यामुळे कणकवली महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक, कला, क्रीडा, एनसीसी इत्यादी क्षेत्रात मुंबई विद्यापीठात सतत आघाडीवर यश संपादन केले आहे.

'केजी टू पीजी' पर्यंत उच्च शिक्षण देणारे ग्रामीण भागातील दर्जेदार महाविद्यालय असा लौकिक असलेल्या कणकवली महाविद्यालयात जिल्ह्यातील बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सुलभ व लवकरात लवकर प्रवेश निश्चित व्हावा यासाठी  महाविद्यालयात स्वतंत्र प्रवेश कक्ष स्थापन केला असून या कक्षामार्फत विनाशुल्क ऑनलाइन प्रवेश नोंदणी केली जाईल. 

बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी १० वी व १२ वी उत्तीर्ण मूळ गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, ईमेल आय डी, पासपोर्ट फोटो, आदी कागदपत्रे घेऊन कणकवली महाविद्यालयात प्रवेश पूर्व नोंदणीसाठी उपस्थित राहून muugadmission.samarth. edu.com या संकेतस्थळावर प्रवेश पूर्व नोंदणी करून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन कणकवली महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे यांनी केले आहे.