दिगशी पाष्टेवाडी रस्त्याच्या कामाची चौकशी व्हावी - स्वप्नील धुरी

राजकीय पदाधिकाऱ्यांच्या दबावापोटी दुर्लक्ष : धुरी
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 12, 2023 17:59 PM
views 174  views

वैभववाडी : तालुक्यातील तिथवली ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या दिगशी मुख्य रस्ता ते पाष्टेवाडी रस्ता हे काम अत्यंत निकृष्ठ झालेलं आहे, या बोगस कामाची चौकशी करावी, अशी मागणी युवासेनेचे जिल्हा चिटणीस स्वप्नील धुरी यांनी केली आहे.


दिगशी गावात नव्याने रस्त्याचे काम केले आहे. हे काम करून १५ दिवस पण झाले नसून या रस्त्याचे डांबर चक्क हाताने निघत आहे. तसेच हे काम अंदाजपत्रकानुसार झालेलं नाही, असा धुरी यांचा आरोप आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने पहिल्याच पावसात ते वाहून जाण्याची शक्यता अधिक आहे. अशा प्रकारची निकृष्ठ दर्ज्याची काम होत असताना त्या विभागाच्या अधिकाऱ्यांचं लक्ष नसल्याचं दिसून येत आहे.


हे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत की येथील राजकीय पदाधिकाऱ्यांच्या दबावापोटी दुर्लक्ष करत आहेत. राजकीय लोकांनीच हे असले बोगस ठेकेदार आणून ठेवले आहेत, हे ठेकेदार त्या त्या गावातच मोठे मोठे स्फोट घडवून खडी फोडत आहेत, अशा ठेकेदारांवर योग्य ती कारवाई  करावी, तसेच निकृष्ठ झालेलं काम परत करून घ्यावं, तोपर्यंत त्या ठेकेदाराला बिल देण्यात येऊ नये, असे पत्र स्वप्नील धुरी यांनी उप अभियंता बांधकाम विभाग कणकवली, शाखा अभियंता बांधकाम विभाग वैभववाडी यांच्याकडे देण्यात आले आहे.


जर योग्य ती कार्यवाही झाली नाही तर पुढील सगळ्या गोष्टीसाठी  संबंधित विभाग जबाबदार असेल, असा इशारा धुरी यांनी दिला आहे.