डिजिटल मीडियामुळे पत्रकारितेतील जॉबच्या संधीत वाढ : प्रा.डॉ. सुधीर इंगळे

दळवी कॉलेजमध्ये भावी पत्रकारांना मार्गदर्शन
Edited by: ब्युरो
Published on: November 24, 2023 19:30 PM
views 54  views

कणकवली : कणकवली येथील मुंबई विद्यापीठाच्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयास प्रा.डॉ.सुधीर इंगळे ,विभाग प्रमुख पत्रकारिता व जनसंवाद विभाग शिवाजी महाविद्यालय परभणी यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीत त्यांनी 'पत्रकारिता व प्रसार माध्यमातील संधी' या विषयावर ऑनलाईन व ऑफलाईन मोडवर मार्गदर्शन केले. आयोजन मास मीडिया विभागानी केले होते.  यावेळी महाविद्यालयातील वरिष्ठ सहा.प्राध्यापक हेमंत महाडिक उपस्थित होते.


महाविद्यालयाचे मानद मार्गनिर्देशक विनायक दळवी यांनी महाविद्यालयांमध्ये सुरू केलेल्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी कंदील पणत्या व फराळ बनवावा; त्याची विक्री करावी आणि या विक्रीतून मिळालेल्या पैशातून दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत दिवाळी साजरी करावी अशा प्रकारचा "दळवी डब्बा आईस स्पाइस" उपक्रम दरवर्षी साजरा केला जातो.  या अंतर्गत येणारा 'कॅप्टन कुकडे' या उपक्रमात डॉ.इंगळे सहभागी होत फराळ खरेदी केला व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हेमंत महाडिक, यांनी पाहुण्यांचा परिचय करून त्यांचे स्वागत केले.

या प्रसंगी बोलतांना  डॉ.इंगळे म्हणाले की,  "मास मीडिया शाखा व इतर शाखेतील विद्यार्थ्यांना मोबाईलमुळे  पत्रकारिता करणे व जनसंवाद साधने फार सोपे झाले आहे, त्यामुळे डिजिटल मीडियामुळे पत्रकारिता व जनसंवादातील क्षेत्रातील संधी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. याकरिता नवतंत्रज्ञान, संवादकौशल्य, सोशल मीडियाचा अभ्यास पूर्वक वापर करावा.असे ते म्हणाले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. प्राध्यापक नरेश शेटिये यांनी तर आभार सहा. प्राध्यापक प्रशांत हाटकर यांनी मानले. यावेळी  विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.