
सावंतवाडी : सरपंच पदाचा गैरवापर करून शासकीय पैसे स्वतःच्या खात्यात वर्ग करणाऱ्या निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर यांच्यावर आर्थिक गैर व्यवहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी करत पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
जोपर्यंत श्री. निगुडकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत योग्य ते आश्वासन किंवा कार्यवाही होत नाही तोपर्यंत आपण माघार घेणार नाही असा इशारा गवंडे यांनी दिला आहे. त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की, पंधराव्या वित्त आयोगातील ग्रामपंचायत मधून इमारत रंगकाम करणे कामापोटी देण्यात येणारी रक्कम ठेकेदाराला अदा न करता ती त्यांनी आपल्या खात्यात वळवली. त्यामुळे हा गैर व्यवहार झाला आहे. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी त्यांनी मागणी केली आहे. येथील पंचायत समिती कार्यालयात उपोषणाला बसले आहेत.