
सावंतवाडी : सायबर गुन्ह्याच्या विविध माध्यमातून लोकांची लूट चालू आहे. याबद्दल लोकांनी जागृत राहायला पाहिजे. जनजागृती करताना सायबर गुन्हे, नशा मुक्ती आणि अंमली पदार्थ अशा घटनाबाबत काही माहिती असेल तर पोलिसांना ती द्यायला पाहिजे.आतापर्यंत यासाठी ३०० कार्यक्रम घेऊन जागृती केली असली तरी लोक फसतच असल्याने जनतेने पुढे यायला हवे असे आवाहन पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी केले. काझी शहाबुद्दिन हॉल येथे सायबर सुरक्षित भारत, नशा मुक्ती त्याचप्रमाणे डायल ११२ जनजागृती अभियान अंतर्गत जनजागृती मोहिमेत ते बोलत होते.
यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सावंतवाडी मधील रिक्षा चालक व मालक, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, शांतता समितीचे सदस्य, ज्येष्ठ नागरिक, पोलिस पाटील यांना सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी सायबर सुरक्षित भारत, नशा मुक्ती त्याचप्रमाणे डायल ११२ जनजागृती अभियान अंतर्गत मार्गदर्शन केले. यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे, पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण आदी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी या जनजागृती बद्दल माहिती देऊन लोकांनी घटना घडल्यानंतर वेळीच पोलीस ठाण्याला माहिती द्यावी असे आवाहन केले.
पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल म्हणाले, व्हिडिओच्या माध्यमातून अटक करू असे सांगणाऱ्यांच्या समोर लोक फसत असून त्यांना ऑनलाईन पैसे देतात तसेच सायबर गुन्ह्याच्या विविध माध्यमातून लोकांची लूट चालू आहे याबद्दल लोकांनी जागृत राहायला पाहिजे. जनजागृती करताना सायबर गुन्हे, नशा मुक्ती आणि अंमली पदार्थ अशा घटनाबाबत काही माहिती असेल तर पोलिसांना ती द्यायला पाहिजे. शाळा कॉलेजच्या आवारात किंवा शहरांमध्ये अंमली पदार्थ चे प्रमाण वाढत असल्याच्या तक्रारी आहेत असे कोणी करत असेल किंवा त्याच्या आहारी गेली असतील तर त्याची माहिती पोलिसांना द्यायला पाहिजे. शाळा, कॉलेज, सार्वजनिक जागेत असे प्रकार घडू नयेत यासाठी नक्कीच पोलीस कारवाई करतील.
ते म्हणाले,पोलीस दलाच्या माध्यमातून वेळीच कारवाई करण्यासाठी पावले टाकली जातात. त्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत डायल ११२ मध्ये अनेक प्रकरणाची उकल झाली आहे सायबर क्राईम, महिला सुरक्षा, पर्यटन, रस्ता सुरक्षा, असे विविध सुरक्षेचे मुद्दे आहेत मात्र सायबर गुन्हे, नशा मुक्ती आणि डायल ११२ वर आम्ही विशेष जनजागृती मोहीम सुरू केली आहे. गुन्हेगारी क्षेत्रातील प्रत्येक घटना पोलिसांना नागरिकांनी कळवली पाहिजे त्यामुळे त्याबाबत वेळीच खबरदारी घेता येईल. या जनजागृतीसाठी आतापर्यंत ३०० कार्यक्रम केले आहेत.सायबर गुन्ह्यांमध्ये विलंब न लावता तात्काळ पोलिसांना माहिती मिळाली तर ऑनलाईन पैसे होल्ड करून ठेवता येतात आणि नंतर ते न्यायालयाच्या माध्यमातून पुन्हा मिळवता येतात.यावेळी पत्रकार अभिमन्यू लोंढे, सिताराम गावडे, आनंद जाधव, अँड नकुल पार्सेकर आदींनी सायबर गुन्हे , अंमली पदार्थ व डायल ११२ बाबत शंका उपस्थित केल्या. त्यावेळी पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी पोलीस ठाण्यामध्ये सायबर गुन्हा दाखल केलाच पाहिजे. सायबर गुन्ह्यांमध्ये चौकशी ही जलद गतीने होते. पैसे होल्ड करून ठेवता येतात,ते न्यायालयातून सरकारी वकील देऊन सुद्धा वसूल करता येतात असे सांगितले. सायबर गुन्ह्यांमध्ये विविध पातळ्यांवर लोक फसत आहेत. तर पेन्शनरना गंडा घातला जात आहे. अंमली पदार्थांच्या विळख्यात लोक, विद्यार्थी सापडले आहेत. त्यामुळे जनतेने जागृतपणे पोलिसांना वेळीच माहिती दिली तर कारवाई जलदगतीने होवू शकते असे पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल म्हणाले.