LIVE UPDATES

धोंडी चिंदरकर सैरभैर; युतीचा विसर

चिंदर माजी सरपंच संतोष कोदे यांचा पलटवार
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 09, 2025 19:30 PM
views 209  views

मालवण : चिंदर गावच्या उपसरपंच निवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेस पक्षाच्या महेंद्र मांजरेकर यांच्या विजयाचा आनंद साजरा करतं त्यांना झोके देण्याचे काम भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर करतं आहेत अशी टीका चिंदर गावचे माजी सरपंच संतोष कोदे यांनी केली आहे. 

चिंदर गावचे माजी सरपंच संतोष कोदे यांनी म्हटले आहे, महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. याचा बहुदा विसर भाजपा मालवण तालुकाध्यक्ष असलेल्या धोंडी चिंदरकर यांना पडला आहे का?  किंवा ते सैरभैर झाले असावेत.  हे त्यांच्या कृतीतून दिसून येत आहे. 

जर ते सैरभैर झाले नसतील तर त्यांनी हे सर्व जाणून बुजून केले का? महायुतीचा धर्म बाजूला ठेवून विरोधकांना त्यांनी साथ दिली का? हा प्रश्न या निवडणुक निकालातून निर्माण झाला आहे. त्यामुळे काही मुद्दे जनतेसमोर येणे गरजेचे आहेत. किंबहुना धोंडी चिंदरकर यांनी वस्तुस्थिती मांडण्याची संधी निर्माण करून दिली आहे.

2021 चिंदर ग्रामपंचायत निवडणुकीत धोंडी चिंदरकर हे भाजपा तालुकाध्यक्ष होते आजही आहेत. 11 सदस्य असलेल्या या ग्रामपंचायत मध्ये त्यावेळी भाजपा 5, उबाठा 5 आणि 1 काँग्रेस असे संख्याबळ होते. याचा अर्थ तेव्हा विरोधकांकडे जनतेने बहुमत दिले. भाजपा तालुकाध्यक्ष गावात अपयशी ठरले. मात्र काँग्रेसच्या महेंद्र मांजरेकर यांची साथ घेऊन धोंडी चिंदरकर यांनी सत्ता बसवली. आपली पाठ थोपटून घेत नेत्यांना खोटी माहिती दिली. मुळात गावात त्यांच्याकडे बहुमत नव्हते. तीच स्थिती 2024 विधानसभा निवडणुकीत राहिली. असे असताना काहींनी आमचा एनकाउंटर केला अश्या बोंबा मारून चिंदरकर हे अपयश लपवण्याचा प्रयत्न करत राहिले.

2024 दरम्यान काही सदस्यांनी पक्ष बदलले. 2 सदस्य बाद झाले. त्यामुळे ग्रामपंचायत संख्याबळ 2 भाजपा, 3 शिंदे शिवसेना, 3 उबाठा आणि एक काँग्रेस असे झाले. ग्रामपंचायत मध्ये भाजपा शिंदे शिवसेना यांचे बहुमत असताना उपसरपंच निवडणुकीत काँग्रेसचे महेंद्र मांजरेकर उपसरपंच पदी विजयी झाले. याचा आनंद चिंदरकर साजरा करतं आहेत. म्हणजे भाजपाची मते मांजरेकर यांना मिळाली असेच म्हणावे लागेल. तर दुसऱ्या बाजूने असेही म्हणवे लागेल की गावातच चिंदरकर यांना बहुमत राहिले नाही. 

त्यामुळे अजूनही वेळ गेली नाही जर महेंद्र मांजरेकर यांचा आनंद धोंडी चिंदरकर ठामपणे साजरा करतं असतील तर त्यांनी महेंद्र मांजरेकर यांचा भाजपा प्रवेश करावा. निश्चित आम्ही महायुती म्हणून त्यांचा सत्कार करू.


जर असे होत नसेल तर धोंडी चिंदरकर यांनी अपयश मान्य करून वरिष्ठाना खरी माहिती द्यावी. वरीष्ठांची फसवणूक करू नये असे संतोष कोदे यांनी म्हटले आहे.