नियतीच्या परीक्षेला धनश्री गेली धाडसाने सामोरी..!

सकाळी दिला दहावीचापेपर अन संध्याकाळी जन्मदात्रीला अग्नी | धाडसचं होतंय कौतुक | पुरोगामी महाराष्ट्राला साजेशी कृती
Edited by:
Published on: March 11, 2025 17:47 PM
views 971  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा जाधववाडीत एका मुलीने सकाळी दहावीचा गणिताचा पेपर लिहून दुपारी आपल्या आईवर अंत्यसंस्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने मुलीच्या धाडसाचे आणि तिला साथ देणाऱ्या समाजातील सुधारणावादी कार्यकर्त्यांचेही अभिनंदन होत आहे.

सातार्डा जाधववाडीतील सौ. रुपाली राजन जाधव ( ४८ ) या महिलेचे रविवार दिनांक ९ मार्च रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. तिच्या पश्चात पती आणि दोन मुलीच असल्याने तिचे अंत्यसंस्कार विधी कोणी करायचे असा प्रश्न निर्माण झाला होता.  मोठी मुलगी धनश्री ही देवसु तालुका पेडणे येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता दहावी शिकत असल्याने व सोमवारीच तिचा गणिताचा पेपर असल्याने एका बाजूला आईचे दुःख आणि दुसऱ्या बाजूला भविष्याचा प्रश्न असल्याने तिच्यासमोर मोठी समस्या निर्माण झाली होती. मात्र, याच गावचे सुपुत्र आणि पेडणे गोव्यात स्थायिक झालेले कार्यकर्ते तथा साहित्यिक चंद्रकांत जाधव यांनी ही बाब शाळेच्या प्रशासनाच्या कानी घातले आणि प्रशासनाने सदर मुलीच्या घरी तातडीने भेट देत मुलीचे सांत्वन केलं आणि परीक्षेचे महत्त्व विशद केले.

त्यानंतर मुलीला परीक्षेला नेण्याची आणि आणून पुन्हा सोडण्याची जबाबदारी घेतली. त्यानुसार मुलीला स्वतः घेऊन जाऊन शाळा प्रशासनानेच पुन्हा आईच्या अंत्यसंस्काराला मुलीला आणूनही सोडले. त्यामुळे सकाळी पेपर आणि दुपारी अंत्यसंस्कार पार पडले. मुलगी धनश्री हीच कुटुंबातील मोठी असल्याने तिच्या हस्ते आईचे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय कुटुंबाने घेतल्याने सकाळी पेपर झाल्यानंतर संध्याकाळी आईवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामीण भागात आईवर अंत्यसंस्कार करण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याने तिचे व तिला पाठिंबा देणाऱ्या सर्व सुधारणावादी शिक्षक, पालक, ग्रामस्थ यांचे अभिनंदन होत आहे.