
सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागृहातील नव्यानं बसविलेला फ्रीजर पुन्हा बंद अवस्थेत आहे. नव्यानं बसविलेला फ्रीजर बंद असल्यान व कुलिंग न होत नसल्यानं युवा रक्तदाता संघटनेन आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामुळे आपत्कालीन प्रसंगी मृतदेह ठेवायचा कुठे ? असा प्रश्न नातेवाईकांसमोर उभा ठाकत आहे. जिवंतपणी आरोग्य सेवेत अभाव असल्यानं यातना सहन कराव्या लागत असतानाच आता मेल्यानंतरही वैद्यकीय समस्या पाठ सोडत नाहीत. याबाबत युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त करत उप जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षकांनी ७ दिवसांत यावर तोडगा काढावा अशी मागणी केली आहे.
संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे असा आरोप युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी केला आहे. नव्यान बसविलेला फ्रीजर कुलिंग देत नसेल तर त्या व्यवहाराची सखोल चौकशी होण आवश्यक आहे. सावंतवाडीच्या वैद्यकीय अधिक्षकांनी याचा पाठपुरावा करणं आवश्यक होतं. मात्र, त्यांचा याकडे दुर्लक्ष होत आहे. मागे आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर बांधकाम व रुग्णालय प्रशासनाने तातडीने ह्याची दखल घेतली होती. नव्यानं फ्रीजर बसविला. परंतु, उपजिल्हा रुग्णालयात असलेला शवागृहातील कुलिंग न देत असल्यानं तो कुचकामी ठरत असून बंद आहे. तालुक्यात आरोग्य सेवेचा अभाव असल्याने गोवा येथे रूग्ण पाठवले जातात. त्यात अतिगंभीर रूग्ण तात्काळ उपचारांसाठी खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल होतात. दरम्यान, रूग्ण दगावल्यास रात्री-अपरात्री मृतदेह ठेवायचा कुठे? हा प्रश्न नातेवाईकांना पडतो आहे. मृतदेह ठेवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नुकतच गोवा येथे खासगी रूग्णालयात उपचारासाठी पाठवलेल्या रूग्णाचा गोव्यात पोहचेपर्यंत मृत्यू झाला. त्यानंतर हा मृत रूग्ण ठेवण्यास हॉस्पिटल प्रशासनाने नकार दिला. त्यात सावंतवाडीतील शवागृहात टेंपरेचर मेंटेन होत नसल्यानं मध्यरात्री नातेवाईकांची तारांबळ उडाली. गोवा येथील हॉस्पिटल प्रशासनाच्या हातापाया पडायची वेळ त्यांच्यावर आली. त्यानंतर मृतदेह ठेवण्यात आला व आर्थिक भुर्दंड नातेवाईकांना सोसावा लागला. जीवंतपणी होणारे हाल समोर असतानाच आता मेल्यानंतरही मृतदेहांची अवहेलना वैद्यकीय अधिक्षकांच्या कारभारामुळे होत आहे. यासंदर्भात तातडीन उपायोजना करावी व कुलिंग न देणाऱ्या नव्या फ्रीजरच्या व्यवहाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे केली आहे. तर शवगृहाच्या इमारतीच्या सुधारणेसाठी बांधकाम विभागाचही लक्ष त्यांनी वेधलं आहे.