श्री भराडी आईच्या दर्शनाला भाविक आतुर | 12 लाखाहून अधिक भाविकांची असणार उपस्थिती

श्री भराडी देवीचे भक्त व चाकरमान्यानी आंगणेवाडी परिसर गेला गजबजुन
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: February 03, 2023 19:50 PM
views 124  views

मालवण : नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडीमातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक आतूर झाले आहेत. वस्त्रालंकारानी सजलेले देवीचे रुप पाहण्याचे भाग्य यात्रेच्या दिवशी लाभत असल्याने भाविकांचा महापुर ४ फेब्रुवारी २०२३ रोजी आंगणेवाडीत उसळणार आहे. नवसाला पावणाऱ्या व भवानीचे रुप असलेल्या भराडी मातेच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, विविध पक्षांचे राजकीय नेते, खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक येणार असल्याने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. गेला महिनाभर सुरु असलेली यात्रोत्सवाची तयारी आंगणे कुटुंबीय, जिल्हा प्रशासन यांनी पूर्ण केली आहे. भराडी देवीचे भक्त व चाकरमान्यानी आंगणेवाडी व परिसर गजबजुन गेला आहे. यावर्षी यात्रेत १२ लाखाहून अधिक भाविकांची उपस्थिती असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. भाविकांच्या स्वागतासाठी आंगणेवाडी नगरी सज्ज झाली आहे. 


देवी भराडीचा महिमा जिल्ह्या पुरता मर्यादित न राहता संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. त्यामुळे आंगणेवाडीच्या यात्रेला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. यात्रोत्सवाच्या निमीत्ताने सुवर्ण अलंकाराने भरजरी साडी नेसवून मातेला सजविण्यात आले आहे. यात्रेदिवशी मातेचे तेजोमय रुप पाहून भाविक सुखावणार आहेत. गाभाऱ्यामध्ये ओट्या भरण्यासाठी शिस्तबध्द नियोजन आंगणे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे. सभामंडप व गाभाऱ्याचे रुप रेशमी कापडी पडदे, विविध फुलांच्या सजावटीने अवर्णनिय असेच भासणार आहे.


यात्रोत्सवास ओट्या भरण्यास पहाटे तीन वाजता सुरुवात होणार आहे. आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर सजविण्यात आला आहे. भाविकांना मौज घडवून आणण्यासाठी आकाश पाळणी, मौत का कुआ वैगरे मनोरंजनाची खेळणी सज्ज झाली आहेत. मालवण, मसुरे व कणकवली स्टँड नजिक पार्कींग व्यवस्था करण्यात आली आहे. महावितरण कंपनीने सुध्दा अखंडीत विज पुरवठ्यासाठी खबरदारी घेतली आहे. कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ६ अभियंता, ४० कर्मचारी कार्यरत असणार आहेत. मालवण एसटी आगाराच्या वतीने ५० स्पेशल गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.


मंदिर व मंदिर परिसरात ३५ ठिकाणी क्लोज सर्किट कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच ड्रोन कॅमेऱ्याद्वारे यात्रेचे छायाचित्रण करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या वतीने दक्षता घेण्यात येत आहे. मोबाइल स्वच्छतागृह उभारण्याचे काम पूर्णत्वास जात आहे. हंगामी जिओ टॉवर उभारण्यात आला असून हा टॉवर गुरुवारी कार्यान्वित झाला आहे.


महावितरण कंंपनीकडुन हंगामी व्यापाऱ्यांना तात्पुरती विज जोडणी दिली जात आहे. कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी पोलीस विभागाकडून बंदोबस्त राहणार आहे. तसेच टेहळणी टॉवर, साध्या वेशातील महिला व पुरुष कर्मचारी यात्रेवर लक्ष ठेवून असणार आहेत. महनीय व्यक्तीसाठी मुख्य स्वागत कक्षा लगतच खास व्यवस्था करण्यात आली आहे. 


देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी नऊ रांगांमधुन व्यवस्था करण्यात आली आहे. उद्या रात्री ९.३० ते १२ या वेळेत धार्मिक विधीसाठी भाविकांच्या ओट्या भरण्याचा कार्यक्रम बंद ठेवण्यात येणार आहे. सर्व भाविकांनी संयम व शिस्त बाळगुन देवीचे दर्शन रांगेतूनच घेण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी केले आहे.  


गेली तीन वर्षे कोरोनाच्या निर्बंधाखाली ही यात्रा होत होती. त्यात गेल्यावर्षी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुद्धा होता. त्यामुळे अनेक भाविकांना यात्रेसाठी येता आले  नव्हते. मात्र, यावर्षी कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे रेकॉर्ड ब्रेक गर्दी यावर्षी यात्रेला होणार आहे. त्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा आणि ग्रामस्थ मंडळ सज्ज झाले आहे.