
सावंतवाडी : सोलापूरच्या शुभराय मठात माजगावच्या ओंकार महापुरुष भजन मंडळाने सादर केलेल्या स्वरचित सुश्राव्य भजनाने मठातील भाविक मंत्रमुग्ध झाले. अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराजांचे लाडके शिष्य असलेल्या शंकर महाराज यांच्यासह त्यांचा महतीवर या मंडळाने स्वरचित अभंग सादर करीत मंदिर ट्रस्टींच्या शाबासकीची थाप मिळवली.
ओंकार महापुरुष भजन मंडळाचे एच. बी.सावंत यांनी स्वतः रचलेले अभंग व गीते सादर करून भाविकांची मने जिंकली. यावेळी एच बी सावंत यांच्या स्वरचित अभंगानी शंकर महाराज यांच्या आठवणी जागृत केल्या. यावेळी मठाच्या ट्रस्टी शुभांगी ताई बुवा याही भाऊक झाल्या. मंडळाच्या इतर गायकांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक अशा भक्तीमय भजनाने मठातील उपस्थित भाविकांचे कान तृप्त झाले.
यावेळी शुभराय ट्रस्टच्या सर्वेसर्वा श्रीम. शुभांगी ताई यांनी या भजन मंडळाच्या आदरतिथ्यासह त्यांचा यथोचित सन्मानही केला. यावेळी श्री स्वामी समर्थ या टीव्ही मालिकेतील स्वामीची भूमिका करणारे अशोक कुलकर्णी हे सुद्धा मंडळाच्या या सुश्राव्य भजनाने बेहद्द खुश झाले. त्यांनी या भजनाची चित्रफित या मंडळाकडून खास मागूनही घेतली. शुभराय मठातील या भजन सेवेसाठी एच बी सावंत यांनी सोलापूरच्या शुभराय मठाच्या महतीचे व्हिडिओ मागवून घेऊन स्वतःच अभंग तयार केले. त्यानंतर या भजन सेवेच्या पूर्वतयारीसाठी शंकर महाराज, स्वामी समर्थ, दत्त, मारुती, धनकवडी मठ, राम या देवतांच्या सर्व अभंग व गाण्याची आठ दिवस माजगावात उजळणी करण्यात आली. या भजन सेवेचे नियोजन मंडळाचे विक्रम जाधव यांनी केले. त्यासाठी त्यांनी शुभराय मठाच्या ट्रस्टींशी संपर्क साधून आणि त्यांची परवानगी घेऊन भजन सेवेची तारीख व वेळ निश्चित केली. या भजन सेवेत हनुमंत सावंत, विक्रम जाधव, अँड. चंद्रशेखर ऊर्फ सचिन गावडे, अथर्व नाईक, विलास नाईक, ज्ञानेश्वर सावंत, गौतम सावंत या गायकांना संगीतसाथ हनुमंत सावंत (हार्मोनियम), विवेकानंद सावंत, सोमेश्वर सावंत (तबला), संदिप गावडे (तलरक्षक), ओंकार सावंत, रावजी सावंत, हरिष सावंत संचित गावडे, अज्नेय गावडे (कोरस) यांनी संगीत साथ दिली. यावेळी मळगाव येथील स्वामी समर्थ महाराज मठाचे श्री राऊळ आवर्जुन उपस्थित होते. विशेष म्हणजे शुभराय मठाचे शंकर महाराज हे स्वामी समर्थांचे लाडके शिष्य होते. त्यांच्या मठात भजन सादर करण्याचे भाग्य या मंडळाला लाभले. गेल्या वर्षीही ओंकार महापुरुष भजन मंडळाने निश्चय व इच्छा शक्तीच्या जोरावर योग्य नियोजन करून राज्यातील पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर, सोलापूरचा शुभराय मठ, नरसोबावाडीचे दत्त मंदिर अशा राज्यातील प्रसिद्ध चार मंदिरामध्ये भजन सेवा परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण केली होती.