
देवगड : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत देवगडसमोरील १० वाव खोल समुद्रात अनधिकृत मासेमारी करणाऱ्या 'भारद्वाजा' या परप्रांतीय नौकेवर मत्स्य व्यवसाय विभागाने कारवाई करीत ही नौका जप्त केली. ही नौका कर्नाटक येथील अशोक गोपाल सालिन (मल्लपी- कोडूवूर, उडुपी) यांच्या मालकीची आहे. ही कारवाई शनिवारी रात्री १०.४५ वा. च्या सुमारास करण्यात आली. ही नौका कारवाईसाठी देवगड बंदरात आणण्यात आली आहे.
देवगडचे सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे (अंमलबजावणी अधिकारी) हे पोलीस कर्मचारी श्री. पाटील तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व रक्षक या पथकासमवेत देवगड समुद्रात शनिवारी रात्री नियमित गस्त घालत असताना देवगडसमोरील सुमारे १० वाव खोल समुद्रात 'भारद्वाजा' (नोंदणी क्र. IND-KA-02-MM-4171) ही परप्रांतीय नौका अनधिकृत मासेमारी करताना आढळून आली. मत्स्य व्यवसाय विभागाच्या पथकाने ही नौका ताब्यात घेत कारवाईसाठी देवगड बंदरात आणली. कर्नाटक राज्याच्या जलक्षेत्रासाठी परवाना असलेली ही नौका अशोक सालिन यांच्या मालकीची होती. या नौकेवर तांडेलासह खलाशी होते. सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांच्या मार्गदर्शनाखाली या नौकेवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ तथा सुधारणा अधिनियम २०२१ च्या तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली असून नौकेवर आढळलेल्या मासळीची लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. सुनावणीअंती नौकेच्या संबंधित मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.










