
देवगड : मत्स्यव्यवसाय आणि बंदरविकास मंत्री ना. नितेश राणे यांना विविध मागण्यांचे निवेदन मिठबांव मच्छिमार सोसायटीकडून देण्यात आले. देवगड तालुक्यातील मिठबांव फिशिंग अँड ट्रेडिंग को - ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड (स्थापना ३० जून १९४८) या संस्थेच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच मत्स्यव्यवसाय आणि बंदरविकास मंत्री ना. नितेश राणे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनावर सोसायटीचे सचिव सीताराम (काका) मुणगेकर यांनी स्वाक्षरी केली असून, मच्छिमार बांधवांच्या सामाजिक आणि आर्थिक अडचणींबाबत मंत्री नितेश राणे यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मासेमारी करताना अपघाती मृत्यू झाल्यास शासनाकडून केवळ ६० वर्षांखालील मच्छिमारांच्या वारसांना आर्थिक मदत दिली जाते.मात्र मच्छिमार बांधव अंगात ताकद असेपर्यंत मासेमारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. त्यामुळे ६० वर्षांची वयोमर्यादा शिथिल करून सर्व वयोगटातील मच्छिमारांच्या वारसांना शासकीय मदत मिळावी,अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच पावसाळी म्हणजेच बंद हंगामात शासनाकडून मासेमारीवर बंदी असते.या काळात मच्छिमार बांधवांना कोणताही उत्पन्नाचा स्रोत नसतो.त्यामुळे या बंदीच्या काळात त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सानुग्रह अनुदान मिळावे,अशी मागणी सोसायटीने केली आहे.
याशिवाय,निवेदनात मच्छिमारांचा व्यवसाय सतत वादळ, पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे प्रभावित होत असल्याचे नमूद केले आहे. या कारणांमुळे अनेक मच्छिमारांचे बँक कर्जाचे हप्ते थकले आहेत. त्यामुळे या संकटग्रस्त मच्छिमारांचे कर्ज शासना कडून माफ करावे ही देखील मागणी आहे.










