
देवगड : देवगड तालुक्यातील युथ फोरम या संस्थेच्यावतीने २५ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत शेठ म. ग. हायस्कूलच्या गुरुदक्षिणा प्रेक्षागृहात भव्य राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे सलग पाचवे वर्ष असून राज्याच्या विविध भागातील रांगोळी कलाकार या स्पर्धेत सहभागी होणार आहेत,अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष ॲड. सिद्धेश माणगांवकर यांनी दिली.
युथ फोरम - देवगड संस्थेच्या रांगोळी स्पर्धेला दरवर्षी स्पर्धक व रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे याहीवर्षी ही राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा मोठ्या दिमाखात पार पाडण्यासाठी संस्थेने नियोजन करण्यात येणार आहे. २५ ऑक्टोबरला भव्य राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा पार पडणार आहे असून, स्पर्धेतील रांगोळींचे प्रदर्शन २६, २७ व २८ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी १० वा. ते रात्री ८ वा. पर्यंत नागरिकांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला रोख १५ हजार रू., सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, द्वितीय क्रमांकाला रोख १२ हजार रू., सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, तृतीय क्रमांकाला रोख १० हजार रू., सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, तसेच चतुर्थ व पाचव्या क्रमांकाला प्रत्येकी पाच हजार रू., सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेतील उर्वरित रांगोळी कलाकारांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेमध्ये ३५ रांगोळी कलाकारांना प्रवेश देण्यात येणार आहे. स्पर्धेची अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी सहसचिव रसिका सारंग (मोबा. ९६५७६२००९३) यांच्याशी संपर्क साधावा, तसेच जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभागी सहभाग घ्यावा असे आवाहन ॲड. माणगांवकर यांनी यावेळी केले आहे. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रणव नलावडे, सचिव अमित पारकर, सहसचिव रसिका सारंग, ऋत्विक धुरी, खजिनदार सागर गावकर, कार्यकारिणी सदस्य आकाश सकपाळ, ॲड. श्रुती माणगावकर, देवगड - जामसंडे शहर अध्यक्ष ओंकार सारंग, उपाध्यक्ष जितेश मोहिते, सचिव - आज्ञा कोयंडे, देवगड कॉलेज युनिट अध्यक्ष दीपक जानकर, सचिव सलोनी कदम आदी उपस्थित होते.