
देवगड : मिठबाव श्री देव रामेश्वराचा सुमारे ३०० वर्षांनी गावरयतेने नारळी पौर्णिमेचा अभूतपूर्व सोहळा पाहिला. यावेळी मानाचा सोन्याचा नारळ सागरतीर्थाला अर्पण करण्यात आला.
देवगड तालुक्यातील मिठबाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरात पारंपरिक श्रद्धा आणि भक्तीचा संगम घडवत नारळी पौर्णिमेचा उत्सव उत्साहात पार पडला. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे, सुमारे तीनशे वर्षांच्या कालखंडानंतर मंदिरातील मानाचा सोन्याचा नारळ श्री देवी गजबादेवी समुद्रकिनारी सागरतीर्थाला अर्पण करण्यात आला.या दिवशी पौती पौर्णिमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सणाचे औचित्य साधून मिठबाव,तांबळडेग, कातवण या तिन्ही गावांतील गावघर रयत मंदिरात सणाच्या निमित्ताने एकत्र आली होती. दुपारी तीन वाजता श्री देव रामेश्वर मंदिरात विधीवत पूजा, व मानाच्या सोन्याच्या नारळाची विशेष पूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिरातील सर्व देवतांना राखी अर्पण करण्यात आली.
हे सर्व धार्मिक विधी पार पडल्यानंतर, श्री देव रामेश्वराच्या आज्ञेनुसार मानाचा नारळ घेऊन गावघर रयतेची मिरवणूक सागरतीर्थाकडे रवाना झाली. ढोल-ताशा, या पारंपरिक वाद्यांच्या गजरात, भक्तिमय जयघोषात संपूर्ण परिसर निनादून गेला.परंपरेचा, श्रद्धेचा आणि भक्तीचा संगम घडवणारा हा उत्सव, श्री देव रामेश्वराच्या कृपेने यंदा भक्तिपूर्वक आणि भव्यतेने साजरा झाला. समुद्रतीर्थावर मानाचा नारळ अर्पण करून या नारळी पौर्णिमा सोहळ्याची सांगता झाली.
हा क्षण ऐतिहासिक ठरला. कारण सागरतीर्थावर मानाचा नारळ अर्पण करण्याची परंपरा शेकडो वर्षांनी पुनर्जीवित झाली होती. या भक्तिभावपूर्ण सोहळ्याच्या निमित्ताने अनेक व्यापारी, ग्रामस्थांची उपस्थिती लक्षणीय होती.