
देवगड : देवगड तालुक्यात शाळा, अंगणवाडीमध्ये पाणी तपासणी मोहिम आरोग्यावर परिणाम करणारा पहिला घटक असणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेवर केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनद्वारे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. याच अंतर्गत पंचायत समिती देवगड अंतर्गत जि.प शाळा तळेबाजार व टेंबवली शाळेतील विदयार्थ्यांना उपविभागीय पाणी गुणवत्ता समन्वयक हर्षदा बोथीकर यांनी पाणी गुणवत्तेचे मार्गदर्शन करत शास्त्रशुद्ध पद्धधतीने पाणी तपासणीचे प्रात्यक्षिके दाखवत पाणी तपासणी केली .
जिल्हा परिषदेच्या 'जलजीवन मिशन'च्या पाणी गुणवत्ता व सर्वेक्षण सनियंत्रण कार्यक्रमांतर्गत ग्रामस्तरावर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर गावनिहाय पाणी गुणवत्ता तपासणीसाठी प्रत्येक गावातील पाच महिलांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली होती. या महिलांना जैविक फिल्ड टेस्ट किट 'एचटूएस व्हायल्स'संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले होते .याच अनुषंगाने पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण उपक्रमांतर्गत देवगड तालुक्यातील सार्व. पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी क्षेत्रीय तपासणी संचाच्या (फिल्ड टेस्ट किटच्या) माध्यमातून शाळा , अंगणवाडीतील पाणी तपासणी मोहिम राबवण्यात येत आहे . या उपक्रमाच्या अंमलबजावणी संदर्भात पंचायत समिती देवगड गटविकास अधिकारी श्री. अरूण चव्हाण यांनी निर्देश दिले आहे .
ग्रामस्थांना जलजन्य आजार होऊ नयेत व पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता उच्चप्रतिची राखली जावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात गावस्तरावर जलसुरक्षक , आरोग्य सेवक तसेच पाणी गुणवत्तेचे प्रशिक्षण घेतलेल्या ५ महिला प्रतिनिधीनींची महत्त्वाची भुमिका असणार आहे .