
देवगड : जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील शंकर जाधव यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा गंभीर विचार करून जामसंडे बाजारपेठेतील स्थानिक दुकानदारांना एक पत्र देऊन शाळेपासून २०० फूट परिसरात तंबाखू,गुटखा विक्री पूर्णपणे बंद करण्याचे आवाहन करणारी एक अनोखी प्रभावी जनजागृती पत्र मोहीम आज राबवली.
या मोहिमेअंतर्गत जामसंडे येथील दुकानदारांना असे कळविण्यात आले आहे की , शालेय शिक्षण विभाग तसेच भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि “ सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने ( प्रतिबंध व नियंत्रण)अधिनियम २००३ (COTPA ACT -2003) च्या कलम ६ (ब) नुसार कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या १०० गज म्हणजेच सुमारे २०० फूट परिसरात तंबाखू ,गुटखा , सिगारेट इत्यादी पदार्थांची विक्री करणे कायद्याने प्रतिबंधित आहे.याची गोगटे प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी जाणीव करून दिली.
विद्यार्थ्यांचे आरोग्य , शिक्षणाचा दर्जा आणि सामाजिक जबाबदारी लक्षात घेता सर्व दुकानदारांनी या कायद्याचे पालन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मुख्याध्यापक जाधव यांनी सर्व दुकानदारांना पटवून दिले. व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी शाळा,पालक आणि स्थानिक समुदायाच्या सहकार्याची गरज असते.गोगटे प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी राबविलेले अभिनव अभियान अनेकांना अनुकरणीय व प्रेरणादायी आहे.