वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहनचालकांवर देवगड पोलिसांची धडक कारवाई !

न्यायालयानं ठोठावला दंड !
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 15, 2022 21:28 PM
views 185  views

देवगड : वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनचालकांवर देवगड पोलिसांनी धडक कारवाई करून न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्या वाहनचालकांवर न्यायालयाने दंडात्मक कारवाई केली आहे.

देवगड पोलिस निरिक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी देवगड व जामसंडे येथे मुख्य मार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अशा स्थितीत वाहने उभ्या ठेवणाऱ्या वाहनचालकांवर धडक कारवाई केली.

देवगड स्टँडसमोर रस्त्यावर वाहनांना अपघात होईल, अशा धोकादायक रितीने गाडी उभी करून ठेवणाऱ्या गाडीमालक विजय विठोबा कोळसुमकर याच्याविरूध्द देवगड पोलिसांनी भादवि कलम २८३ प्रमाणे कारवाई केली. देवगड न्यायालयासमोर हजर केले.न्यायालयाने २०० रूपये दंड व दंड न भरल्यास एक दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.

पोलिसांनी ४ डिसेंबर रोजी जामसंडे बाजारपेठ येथील महाराष्ट्र बँकेजवळ रस्त्यावर अशा पध्दतीनेच वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा रितीने मारूती वॅगनर गाडी उभी करणाऱ्या निलेश आनंद पेडणेकर व याच दिवशी सायंकाळी ५.२० वाजता जामसंडे बाजारपेठ श्री समर्थकृपा गॅरेजसमोर होंडा स्प्लेंडर दुचाकी, वाहनांना अपघात होईल, अशा पध्दतीने धोकादायक रितीने उभी करून ठेवल्याबद्दल संकेत संजय नाटेकर याच्याविरूध्द भादवि कलम २८३ प्रमाणे कारवाई करून देवगड न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने २०० रूपये दंड व दंड न भरल्यास एक दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.

देवगड पोलिस निरिक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉ.उदय शिरगांवकर, पो.कॉ.निलेश पाटील, प्रविण त्रिबंके यांनी ही कारवाई केली.