देवगड, जामसंडेचा पाणीप्रश्न सुटणार..?

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 24, 2023 11:27 AM
views 294  views

देवगड : देवगड जमसंडे करिता कार्यरत असलेल्या नळ योजनेचे नूतनीकरण व बळकटीकरण करणे या कामासाठी जवळपास 7 कोटी 31 लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. या कामांमध्ये वेळवाडी सडा पाण्याच्या टाकीकडे जाण्याच्या पाईपलाईनचे काम करणे, दहिबाव अन्नपूर्णा नदीकडे स्ट्रेंज गॅलरीचे काम, दहीबाव पंप स्टेशन ते सडा टाकीपर्यंत व तेथून खाकशी टाकीपर्यंतच्या पाईपलाईनचे काम करणे, दहीबाव पंप स्टेशनला दोन नवीन पंप व नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे, तळेबाजार सब स्टेशन ते पंपिंग स्टेशन पर्यत 11 केव्ही उच्च दाब विद्युत वाहिनी करणे ही कामे तातडीने झाल्यास देवगडमधील पाणी प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

याबाबत ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री म्हणून तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची मुंबईत भेट घेत केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, माजी सभापती संदेश पटेल, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी श्री. पाटील यांनी स्वतः या प्रश्नी देवगड नगरपंचायत मध्ये सप्टेंबरच्या पहिल्या पंधरावड्यात हा प्रश्न मार्गी लावून देवगड वासीयांना दिलासा दिला जाईल. असे आश्वासन दिल्याची माहिती जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी दिली.

या नळ योजनेच्या सातत्याच्या बिघाडामुळे लोकांमध्ये संताप पसरला असून, जनतेला मुबलक पाणी मिळावे याकरिता आपण स्वतः जातीने या प्रश्नी लक्ष द्या अशी मागणी साक्षी प्रभू यांनी याप्रसंगी केली.