
देवगड : देवगड-जामसंडे शहरातील घंटागाडीने दोन दिवस दांडी मारल्यामुळे शहरातील कचरा व्यवस्थापनाचे तीन तेरा वाजल्यामुळे कचरा नागरिकांच्या घरी पडून राहिला. त्यामुळे घरामध्ये दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याकडे नगराध्यक्षा,मुख्याधिकारी, आरोग्य शिक्षण सभापती लक्ष देणार का ? असा सवाल शहरातील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
शहरातील कचरा घरोघरी जाऊन घेण्याचे काम नगरपंचायत कर्मचारी करत असतात परंतु गेल्या दोन दिवसापासून घंटागाडी दारामध्ये न फिरकल्यामुळे शहरातील नागरिकांचा कचरा घरातच पडून राहिल्यामुळे घरामध्ये दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. घंटागाडी दारात येणार म्हणून नागरिक आपला कचरा दरवाजासमोर आणून ठेवतात परंतु बराच कालावधी उलटून गेल्यानंतर त्यावर भटके कुत्रे,मोकाट गुरे डल्ला मारत असल्यामुळे कचरा डब्यासह कचऱ्याचे विल्हेवाट करण्याचे काम मोकाट गुरे,मोकाट कुत्रे करत आहे.याचा देखील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील कचरा गोळा करण्यासाठी नगरपंचायतीकडे चार घंटा गाड्या उपलब्ध आहेत त्यापैकी दोन घंटागाडी देवगड जामसंडे शहरात कचरा उचलण्यासाठी फिरत आहेत परंतु दोन घंटागाडी नादुरुस्त झाल्यामुळे कचरा भरलेल्याच स्थितीत नगरपंचायतीच्या आवारात उभ्या करण्यात आलेल्या आहेत या घटनेकडे आरोग्य शिक्षण सभापती नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी गांभीर्याने पाहतील का ? असा सवाल शहरातील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
तसेच चार घंटा गाड्यांपैकी दोन नादुरुस्त झालेल्या घंटागाडीमध्ये कचरा गाडीमध्येच असल्यामुळे नगरपंचायत परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.नादुरुस्त गाडी असेल तर आतील कचरा बाहेर टाकून गाड्या नगरपंचायत परिसरात उभ्या करणे योग्य आहे.परंतु तसे न करता कचरा भरलेल्याच गाड्या नगरपंचायत परिसरात ठेवल्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कचरा संकलन करण्याऱ्या चार गाड्यांपैकी दोन गाड्या नादुरुस्त- सभापती विशाल मांजरेकर शहरातील कचरा समस्येच्या अनुषंगाने आरोग्य शिक्षण सभापती विशाल मांजरेकर यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, शहरांमध्ये कचरा संकलन करण्यासाठी चार गाड्यांपैकी दोन गाड्या नादुरुस्त असल्यामुळे दोन गाड्यांच्या माध्यमातून देवगड-जामसंडे शहरातील कचरा संकलनाचे काम शहरांमध्ये सुरू आहे.लवकरच नादुरुस्त झालेल्या गाड्यांचे काम युद्ध पातळीवर सुरू असून, रविवारी सायंकाळपर्यंत नादुरुस्त झालेल्या गाड्या नगरपंचायतीच्या सेवेत येतील आणि शहरातील कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य रीतीने केले जाईल असे शिक्षण आरोग्य सभापती विशाल मांजरेकर यांनी सांगितले आहे.