
देवगड : देवगड आगार हा गेली १५ वर्षे नवीन गाड्यांपासून उपेक्षित राहिला आहे. रापम सिंधुदुर्ग विभागात नव्याने आलेल्या लाल परिवर्तन २० गाड्या नव्याने दाखल होऊन अखेर देवगड आगारावर नेहमी प्रमाणे अन्याय झाला आहे. या सर्व नवीन गाड्या अन्य आगारात प्रत्येकी १० नवीन गाड्या देण्यात आल्या आहेत . देवगड आगारातील गाड्यांची कमतरता, बंद प्रवासी फेऱ्या यामुळे मुळातच प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नवीन गाड्या आगारात येणार आणि लांब पल्ल्याचा प्रवास सुखकर होणार हे देवगड वासीयांना दाखविलेले गाजर होते.असे प्रवासी वर्गातून बोलले जात आहे.
देवगड वासीयांना जुन्या जीर्ण गाड्या मधूनच प्रवास करायला भाग पाडणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. देवगड आगारात ५६ गाड्यांची आवश्यकता असताना त्यातील १२ गाड्या जुन्या जीर्ण कालबाह्य झाल्याने भंगारात काढल्या गेल्या शिल्लक ४४ गाड्यांमध्ये देवगड आगाराचा कारभार हाकावा लागत आहे.त्यामुळे देवगड आगारातील लांब पल्ल्याच्या बहुतांशी प्रवासी फेऱ्या बंद ठेवाव्या लागल्याने प्रवासी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.देवगड आगारातून गाड्यांच्या कमतरतेमुळे बंद करण्यात आलेल्या चांगल्या भारमानाच्या प्रवासी फेऱ्यात देवगड-उमरगा,देवगड ,पणजी,बेळगाव,सांगली,नालासोपारा,तसेच मिठबाव तांबळडेग फोंडा व अन्य स्थानिक फेऱ्या काहीवेळी बंद कराव्या लागतात .त्यातच नादुरुस्त फेऱ्या यांचाही परिणाम स्थानिक आगार पातळीवरही होत आहे.