
देवगड : सिंधू रक्तमित्र संघटनेने जाहीर केलेले उपोषण जिल्हा शल्य चिकित्सक यांनी देवगड येथे येऊन त्यांना देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये मंजूर असलेले रक्त साठा युनिट येत्या दोन दिवसात सुरू होणार असे आश्वासन दिल्या नंतर सिंधू रक्तमित्र संघटनेने जाहीर केलेले उपोषण स्थगित केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील निवासी वैद्यकीय अधीक्षक एस. पी. इंगळे यांनी देवगड येथे ग्रामीण रुग्णालयात येऊन ब्लड स्टोरेज सेंटरची पाहणी केली व अपूर्ण असलेल्या सोयी सुविधा पूर्ण करून ब्लड स्टोरेज सेंटर येत्या दोन दिवसात कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या .
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय विटकर उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. श्रीपाद पाटील म्हणाले दुर्मिळ रक्त गट वगळता उर्वरित सर्व गटांच्या प्रत्येकी दोन बॅग याप्रमाणे या ठिकाणी ब्लड बँक मध्ये उपलब्ध करून दिल्या जातील पुढे मागणीनुसार याचा पुरवठा करण्यात येईल. देवगड येथील सेंटर २५ ब्लड बॅग एवढी क्षमता असून या पुढील काळातील नियमितपणे कार्यरत असेल असे आश्वासने त्यांनी यावेळी बोलताना दिले.
सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानच्या वतीने २६ जानेवारी रोजी पूकारण्यात आलेल्या आमरण उपोषण स्थगित करण्यात येत असल्याची माहिती यावेळी सिंधुरक्त प्रतिष्ठान च्या वतीने देण्यात आली यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा सदस्य विजयकुमार जोशी, जिल्हा सल्लागार उद्धव गोरे, देवगड तालुका सचिव प्रकाश जाधव, कार्यकारी सदस्य राजेंद्र पाटील, ब्लड कोऑर्डिनेटर ऍड प्रसाद करंदीकर, चंद्रशेखर तेली,आदी उपस्थित होते.