
देवगड : सिंधुदुर्ग भाजपचा पुढाकारातून एक लाख राखी देवाभाऊंसाठी संकल्प करण्यात आला. संदीप साटम यांनी यावेळी पत्रकार परिषदेत घेऊन ही माहिती दिली आहे. भारतीय जनता पार्टीकडून राज्यभर “एक राखी लाडक्या देवा भाऊसाठी” हे अभियान राबवले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तब्बल एक लाख राख्या पाठवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात ९ ऑगस्टपासून ११ ऑगस्टपर्यंत तीन दिवस चालणार असून, जिल्ह्यातील प्रत्येक बूथवरून १०० राख्या पाठवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या अभियानाचे नेतृत्व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. जिल्हा सरचिटणीस संदीप साटम हे या उपक्रमाचे जिल्हा संयोजक असून देवगड तालुका मंडलच्या संयोजक म्हणून माजी नगराध्यक्ष प्रियांका साळसकर काम करणार आहेत. त्यांनी देवगड शहरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत या अभियानाची सविस्तर माहिती दिली.
साटम यांनी सांगितले की, “महिलांना सक्षम करण्यासाठी देवा भाऊंच्या सरकारने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. त्या योजनांचा लाभ घेणाऱ्या भगिनींनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना राख्या पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.”या अभियानासाठी प्रत्येक मंडळांच्या संयोजिका आणि सहसंयोजिका नेमण्यात आल्या आहेत. प्रत्येक मंडळाकडून नियोजनबद्ध स्वरूपात राख्या संकलन आणि पाठवणूक केली जाणार आहे. तसेच, प्रत्येक राखीसोबत मुख्यमंत्र्यांसाठी खास शुभसंदेश पाठवण्यात येणार आहे.या अगोदरही सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवाभाऊंच्या वाढदिवसाप्रसंगी राबवण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात वर्ल्ड रेकॉर्डप्रमाणे 75000 रक्तदाते सहभागी झाले होते, असे उदाहरण साटम यांनी दिले. या अभियानाच्या माध्यमातून राज्याचे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना जनतेकडून थेट प्रेम, आभार आणि शुभेच्छा मिळणार असल्याचे सांगून, “महिलांनी पुढे येऊन या अभियानात सहभागी व्हावे,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याचबरोबर, “हर घर तिरंगा” अभियान देखील १३ ते १५ ऑगस्टदरम्यान जोरात राबवले जाणार आहे. या तीन दिवसांत प्रत्येक बूथवर जाऊन पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी तिरंगा फडकवण्याचे व देशाप्रती प्रेम व्यक्त करण्याचे आवाहन संदीप साटम यांनी यावेळी केले आहे..