‘भल्ली भल्ली भावई’

भावई उत्सव मोठ्या उत्साहात साजरा
Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 17, 2025 16:25 PM
views 157  views

देवगड : देवगड तालुक्यातील साळशी येथे शिवकालीन परंपरा लाभलेला भावई उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.ढोलताशांच्या गजरात आणि “भल्ली भल्ली भावई!” च्या पारंपरिक जल्लोषात, शिवकालीन परंपरेशी नातं सांगणारा भावई उत्सव बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

देवगड तालुक्यातील साळशी येथे,ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि चौऱ्याऐंशी खेड्यांचा अधिपती असलेल्या भावय या उत्सवापासून इनामदार श्री देव सिद्धेश्वर पावणाई देवस्थानच्या वार्षिक उत्सवाला सुरुवात होते.आषाढ महिन्याच्या कर्क संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी साजरा होणारा हा उत्सव श्रद्धा आणि संस्कृती यांचा संगम घडवतो.

इनामदार श्री सिद्धेश्वर देवालयासमोर असलेल्या भावई देवीचा हा पारंपरिक उत्सव असून,ही परंपरा आजही निष्ठेने जपली जात आहे.हा दिवस साळशी गावात सण म्हणून साजरा केला जातो.या दिवशी घराघरांत सणासुदीचा आनंद साजरा करत गोडधोड आणि पारंपरिक जेवणाची रेलचेल असते. सकाळी भावई देवीची पूजा झाल्यानंतर दुपारी देवीस गावातून नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर बारा–पाच मानकरी ग्रामस्थ एकत्र येऊन, भावई देवीकडे उत्सवाची सुरुवात करतात. नंतर इनामदार श्री पावणाई देवालयासमोर ढोल–ताशांच्या निनादात आणि “भल्ली भल्ली भावई!” च्या जल्लोषात पारंपरिक भावई खेळ साजरा केला जातो.

यामध्ये लहानथोर मंडळी उत्साहाने सहभागी होतात. या वेळी एकमेकांना स्नेहपूर्वक माती (चिखल) लावण्याची परंपरा आहे. चेहऱ्यावर राग नाही – असते ती केवळ मनमिळाऊपणाची भावना. मातीपासून माणुसकीपर्यंतचा हा एक अनोखा सांस्कृतिक स्पर्श असतो. हा कार्यक्रम दुपारी अडीच वाजल्यापासून ते सायंकाळी उशिरापर्यंत रंगतो. गावकऱ्यांच्या उत्साही सहभागामुळे तो एक रंगतदार पर्व ठरतो.

या उत्सवात “होळदेव” (मोठा दगड) दोन्ही हातांनी योग्य तोल राखून उचलण्याचे शक्ती प्रदर्शन केले जाते. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे माती व पाण्यामुळे दगड गुळगुळीत होतो आणि त्याला उचलणे कठीण जाते. त्यामुळे हे केवळ ताकदीचे नव्हे, तर कौशल्याचे प्रदर्शन देखील ठरते.यानंतर जमिनीत (चिखलात) पुरलेला नारळ हाताच्या कोपराने शोधून काढण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करतो. या खेळाला ‘सापड खेळणे’ असे म्हणतात. मातीतून नारळ शोधणे ही एक पारंपरिक कसोटी असून, पावसामुळे तयार झालेल्या चिखलामुळे ती अधिक कठीण होते.पावसाअभावी नैसर्गिक चिखल उपलब्ध नसेल, तर पाण्याचा वापर करून कृत्रिम चिखल तयार केला जातो.

यानंतर सर्वजण “चौऱ्याऐंशीच्या चाळा” या ठिकाणी जाऊन नवस बोलणे, नवस फेडणे अशा धार्मिक विधींमध्ये सहभागी होतात. त्यानंतर पुन्हा इनामदार श्री पावणाई देवालयासमोर एकत्र येऊन काल्पनिक शिकारीचा खेळ खेळला जातो. यानंतर, “शिवकला” अर्थात “अवसर काढणे” ही परंपरागत कला सादर केली जाते.

या शिवकलेतील प्रतीकात्मक शिकारीचे मुंडके (टाळ) ढोलताशांच्या गजरात मिराशी कुटुंबाकडे नेले जाते. तेथे त्याची पूजा होते आणि नंतर पारंपरिक भोजनाचा कार्यक्रम पार पडतो.आणि भावई उत्सवाची सांगता होते.या उत्सवाच्या पूर्वसंध्येला, गावातील रोगराई, संकटे दूर जावीत व गावात समृद्धी यावी यासाठी “देसरुढ” हा धार्मिक विधी सायंकाळी पार पडतो.शिवकालीन परंपरेचा निष्ठेने जपलेला हा उत्सव म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नव्हे, तर काळाच्या ओघातही टिकून राहिलेला ग्रामिण संस्कृतीचा ठसा आहे.शेतीचा हंगाम सुरु असतानाही शेतकऱ्यांना विरंगुळा आणि आनंद देणारा भावई उत्सव साळशी येथें दरवर्षी श्रद्धा आणि संस्कृतीच्या भावनेतून साजरा केला जातो.अशा या भावय च्या जल्लोषात लहान थोर सर्व सहभागी होऊन आनंद साजरा करतात अशा प्रकारे हा भावई चा जल्लोष साळशी गावात मोठ्या उत्साहात रंगतो.