रान भाज्या मातीतल्या लोकांचे आरोग्यही जपतात : अॅड. अजित गोगटे

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 13, 2025 19:05 PM
views 84  views

देवगड :  रानभाज्या ह्या केवळ चविष्टच नव्हेत , तर पोषणमूल्यांनी भरपूर आणि औषधी गुणधर्मांनी युक्त आहेत.हाच ठेवा पुढील पिढींपर्यंत पोचावा , स्थानिक रानभाज्यांचे संवर्धन व प्रचार व्हावा , पर्यावरणस्नेही व नैसर्गिक अन्नपद्धतीचा पुरस्कार व्हावा , गणित विषयातील खरेदी- विक्री , नफा- तोटा यांची विद्यार्थ्यांना अनुभूती मिळावी या उद्देशाने जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे या प्रशालेने “ रानभाजी प्रदर्शन व विक्री “ या अभिनव उपक्रमाचे आज आयोजन केले.

रानभाजी प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थाध्यक्ष माजी आमदार अॅड.अजितराव गोगटे यांनी केले.याप्रसंगी मुख्याध्यापक शसुनील जाधव , उपक्रम प्रमुख सतीशकुमार कर्ले ,  विद्यार्थी , पालक,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. आजच्या धावपळीच्या जीवनात पारंपारिक अन्नसंस्कृती हरवत चालली आहे.ग्रामीण संस्कृतीने पिढ्यानपिढ्या जपलेल्या रानभाज्यांचे महत्त्व पुन्हा नव्याने अधोरेखित करण्याची गरज निर्माण झाली आहे. आज ज्या भाज्यांचे आपण प्रदर्शन पाहत आहोत त्या प्रत्येक भाजीच्या मागे परंपरा , पोषण आणि स्वयंपूर्णतेची एक सुंदर गोष्ट दडलेली आहे.या भाज्या केवळ आपल्या मातीत उगम पावतातच , पण त्या मातीत राहणाऱ्या लोकांचे आरोग्यही जपत असतात.असे मत संस्थाध्यक्ष अॅड.अजितराव गोगटे यांनी व्यक्त केले. रानभाजी प्रदर्शन उपक्रमाचे नियोजन विज्ञान शिक्षक सतीशकुमार कर्ले यांनी केले. हा अभिनव उपक्रम यशस्वी केल्याबद्दल संस्थाचालक , विद्यार्थी , पालक, शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी, सतीशकुमार कर्ले यांनी सुयोग्य असे उपक्रम नियोजक केल्याबद्दल त्यांचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी आभार मानलेत.