‘भल्ली भल्ली भावय’चं धुमशान !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 17, 2024 13:49 PM
views 116  views

देवगड : देवगड शिरगाव साळशी येथील इनामदार श्री. पावणाई देवीच्या वार्षिक उत्सवांना आजपासून सुरुवात झाली असून ‘भल्ली भल्ली भावय’ चा धुमशान आज साजरे करण्यात आले. या भावय उत्सवाला शिवकालीन परंपरा लाभलेली आहे.  ऐतिहासिक वारसा लाभलेल्या देवगड तालुक्यातील साळशी येथे डोल ताशाच्या गजरात व ‘भल्ली भल्ली भावय’च्या जल्लोषात शिवकालीन परंपरा असलेला भावई उत्सव मोठ्या उत्साहात आज साजरा करण्यात आला. या उत्सवापासून इनामदार श्री पावणाई देवीच्या वार्षिक उत्सवाला सुरुवात होते.आषाढ महिन्याच्या कर्क संक्रातीच्या दिवशी भावई उत्सव साजरा करण्यात येतो. इनामदार श्री सिद्धेश्वर देवालयासमोर भावई देवी असून तिचा हा उत्सव आहे.

या दिवशी सकाळी भावई देवीची पूजा केली जाते. दुपारी गावातून देवीला नैवेद्य दाखवण्यात येतो. त्यानंतर दुपारी बारा पाच मानकरी ग्रामस्थ एकत्र जमून भावई देवीकडे या उत्सवाला सुरुवात करून इनादार श्री पावणाई देवालयासमोर ढोल ताशाच्या गजरात व ‘भल्ली भल्ली भावय’च्या जल्लोषात भावई खेळली जाते.यामध्ये लहानथोर मंडळी मोठ्या उत्साहात सहभागी होतात.

यावेळी एकमेकास चिखल लावला जातो. तसेच होळदेव (मोठा दगड ) दोन्ही हाताची योग्य पकड देऊन वर उचलून शक्ती प्रदर्शन केले जाते. त्यानंतर जमिनीत (चिखलात ) पुरण्यात आलेला नारळ हस्तकौशल्याने काढण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करताना दिसतात. त्याला ‘सापड खेळणे’ असे म्हणतात.भावई उत्सवाच्या पूर्वसंध्येला ‘देसरुढ’ काढण्याची प्रथा आहे. 

त्यानंतर सर्वजण चौऱ्याऐंशीच्या चाळ्यावर जाऊन नवस बोलणे,नवस फेडणे आदी कार्यक्रम करतात. यानंतर पुन्हा सर्वजण इनामदार श्री पावणाई देवालयासमोर एकत्र येऊन काल्पनिक शिकारीचा खेळ खेळला जातो.शेती हंगाम सुरू असून देखील शेतकऱ्यांना विरंगुळा व आनंद देणारा भावई उत्सव साळशी येथे मोठ्या उत्साहात व जल्लोषात पारंपारिक रितीरिवाजानुसार साजरा करण्यात आला.त्यानंतर शिवकला काढण्याची कला सादर करतात.या शिवकलेकडे शिकार मानवून शिकारीचे मुंडके (प्रतिकात्मक आंब्यांचा टाळ) ढोलताशाच्या गजरात मिराशी कुटुंबियांकडे नेले जाते. तिथे त्याची पूजा करून भोजनाचा कार्यक्रम होतो.