केवळ २ वर्षाततब्बल २२ कोटींची विकासकामे : चेतन चव्हाण

Edited by:
Published on: March 14, 2024 14:49 PM
views 159  views

दोडामार्ग : गेल्या दोन वर्षात कसई दोडामार्ग नगरपंचायतने तब्बल २२ कोटींच्या निधीची विकासकामे मार्गी लावली असून यात शहरासाठी अत्यंत महत्वपूर्ण अशा जलशुद्धीकरण प्रकल्पाचा समावेश असल्याची माहिती नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी  दिली आहे. 

कसई दोडामार्ग नगरपंचायत अंतर्गत मंजूर झालेल्या विकास कामांची माहिती देण्यासंदर्भात येथील नगरपंचायत कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केलं होतं. यावेळी त्यांनी नगरपंचायत कशाप्रकारे गतिमान विकासाची घोडडौड करतेय त्याची माहिती दिली. ते म्हणाले नगराध्यक्ष म्हणून कारभार स्विकारल्यापासून आपल्याला व आपल्या टीमला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोन वर्षात गेल्या अनेक वर्षांपासून शहरवासीयांची डोकेदुखी ठरणारा कसई - दोडामार्गचा जल शुध्दीकरण प्रकल्प हे जिव्हाळ्याच विकास काम मार्गी लागत आहे. तब्बल २ कोटी ३० लाख रुपयांचा जलशुद्धीकरण प्रकल्प मंजूर झाला आहे. तर संपूर्ण शहरात गेल्या दोन वर्षात तब्बल २२ कोटींची विकासकामे आम्ही शहरात मंजूर करून आणली. पण हे श्रेय माझ्या एकट्याचे नाही तर माझे सर्व सहकारी नगरसेवक , आजी -  माजी नगरसेवक, सरपंच , पदाधिकारी, जुनी-जाणती मंडळी साऱ्यांचे आहे. त्यांच्या सहकार्यानेच हे साध्य करणे मला शक्य झाले. आणि आता तर शहरवासीयांचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही कायमचा मिटणार आहे. शहरासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प नसल्याने आणि नगरपंचायत पिण्याच्या पाण्याची विहीर ही तिलारी नदीच्या काठावर असल्याने पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे गाळ विहिरीत येऊन पाणी गढूळ होत होते.त्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प अत्यंत आवश्यक होता. हा प्रकल्प मंजूर झाल्याने आता शहारवासियांना नियमित स्वच्छ पाणी मिळणार आहे.  शहरासाठी हा प्रकल्प मंजूर व्हावा यासाठी आम्ही पाठपुरावा करत होतो. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडेही मागणी केली होती. आणि त्यांनी ती निधी उपलब्ध करून पूर्ण केली असून शहरासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प मंजूर केला. तसे पत्र प्रशासनास प्राप्त झाले असून साठवण टाकीसाठी ६० लाख व मुख्य नळयोजनेअंतर्गत १ कोटी ७० लाख असे तब्बल २ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे आता लवकरच हे काम सुरू होणार असून येत्या काळात शहरवासीयांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणार असून ही आमच्यासाठी मोठी अचिव्हमेंट असल्याचे श्री. चव्हाण स्पष्ट केलं. 

नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे आभार मानले. या दोघांनीही शहराला नेहमीच झुकते माप दिले असून विकास कामांसाठी भरघोस निधी दिला आहे. त्यामुळेच शहराची विकास प्रक्रिया अधिक गतिमान होण्यास मदत झाली आहे. निच्छितच अल्पावधीत यांच्या सहकार्याने दोडामार्ग शहरात खऱ्या अर्थाने विकास गंगा आल्याचेही श्री.चव्हाण यांनी स्पष्ट केलं.