
कणकवली : शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली कॉलेज आयोजित वाणिज्य विभाग, स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन केंद्र, करियर कट्टा, अंतर्गत हमी व गुणवत्ता कक्ष आणि नांदी फाउंडेशन, महिंद्रा प्राईड क्लासरूम पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ४ ते ११ ऑगस्ट, या कालावधीत “जीवन कौशल्ये” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा महिंद्रा प्राईड क्लासरूम पुणे यांच्या केंद्रीय प्रमुख सौ. सीमा भागवत व राज्य समन्वयक श्री.पंकज दांडगे यांच्या समन्वयाने कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी अंतिम वर्षाच्या ४० विद्यार्थीनी विविध कौशल्ये आत्मसात केली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला सहभागी विद्यार्थीनीनी कार्यशाळेमुळे आपल्याला नवीन कौशल्य शिकता आले याबद्दल प्रतिसाद दिला. सहभागी विद्यार्थीना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. उज्वला जंगले, अमिषा लाड आणि साक्षी राणे या विद्यार्थीनीना उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.
नांदी फाउंडेशन, पुणे संस्थेचे प्रशिक्षक मा. योगेश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. कोकणातील विद्यार्थीनीना योग्य मार्गदर्शन मिळाले तर भविष्य उज्ज्वल होऊ शकते. अशा कार्यशाळेमुळे सहभागी विद्यार्थीनीना आत्मविश्वासा बरोबरच सर्वांगीण विकास साधता येतो असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. युवराज महालिंगे म्हणाले, या चर्चासत्रामुळे आपल्या महाविद्यालयात विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यानी जीवनात यशाची अनेक शिखरे पार पाडण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम महत्वाचे ठरतात.
आजचे युग गळेकापू स्पर्धेचे आहे, त्यामुळे विद्यार्थीनीनी प्रचंड मेहनत, कठोर परिश्रम, आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, साहस, संभाषण कौशल्ये, नेतृत्व कौशल्ये, वेळेचे नेटके नियोजन, सकारात्मक दृष्टिकोन, धेयनिष्ठा आणि प्रयत्नांची पराकाष्ठा या गुणांच्या सहाय्याने स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी विविध कौशल्ये विकसित करणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. विद्यार्थीनीनी जीवनात यशस्वी होण्यासाठी येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, यश प्राप्तीसाठी, स्वतःला सिद्ध करून, स्वतः मध्ये बदल घडवावा यासाठी स्वतःचे व्यक्तिमत्व विकसित करून जीवनात यशस्वी होता येते. विद्यार्थीनीनी स्पर्धायुक्त युगात यशस्वी होण्यासाठी अभ्यासपूर्ण वृत्तीने कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे असे, प्रतिपादन केले.
या कार्यशाळेसाठी अंतिम वर्षाच्या ४० विद्यार्थीनीनी सहभाग घेतला. एकूण ६ दिवसात १८ सत्रामध्ये ३६ तास प्रात्यक्षिकासह विद्यार्थीनीनी विविध कौशल्ये आत्मसात केली.
सदर कार्यशाळेचे संयोजन डॉ. रामदास बोलके यांनी केले. विद्यार्थीनीनी आपल्या प्रतिसादात कौशल्य विकसित कार्यशाळेमुळे सकारात्मक बदल झाल्याचे सांगितले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. संदीप तेली व आभार कुमारी अमिषा लाड यांनी केले. प्रास्ताविक डॉ. रामदास बोलके यांनी केले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. महादेव माने, प्रा.अमरेश सातोसे, प्रा.सुजय जाधव, प्रा.लक्ष्मण राठोड,प्रा. गीता सावंत आदि शिक्षक व कार्यशाळेत सहभागी सर्व विद्यार्थीनी उपस्थित होत्या.