नांदगावातील कोळंबाची जत्रा उत्साहात...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: May 06, 2024 09:37 AM
views 224  views

कणकवली :  नवसाला पावणारा..... हाकेला धावणारा आणि मटण भाकरीच्या प्रसादासाठी प्रसिद्ध अशी जत्रा म्हणून ओळखली जाणारी नांदगाव येथील श्रीदेव कोळंबाची जत्रा रविवारी उत्साहात पार पडली.यावेळी श्रीफळ, कोंबडा, बक-यांनी नवस फेड करून भक्ताच्या उच्चांक गर्दीत भक्तांची संकटे दूर करण्यासाठी गाऱ्हाणी घालण्यात आली.कोळंबाच्या जयघोषाने अवघी नांदगाव नगरी दुमदुमली. यावर्षी श्रीदेव कोळंबा देवाच्या जत्रेला भाविकांची अलोट गर्दी उसळली होती. सकाळ सत्रात नवस फेडण्यासाठी कोंबडी,बकरा घेऊन व सायंकाळी मटण भाकरीच्या महाप्रसादाला भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.यामुळे नांदगाव श्रीदेव कोळंबा परीसर भक्तीसागरात न्हावून गेला होता. 

सिंधुदुर्गासह महाराष्ट्र,ईतर राज्यात प्रसिध्द असणारी श्री देव कोळंबाचा जत्रौत्सव रविवारी सकाळी सुरवात झाली.सकाळीच जत्रोत्सवानिमित्त भाविकांनी नवस फोडण्यास सुरवात केल्यानंतर सायंकाळ नविन नवस बोलणे तसेच जत्रेचे वेगळेपण असणारे मटण व भाकरीच्या प्रसादासाठी भाविकाची झुंबड उडाली होती. जिल्ह्याभरासह राज्याच्या अनेक भागातून आलेल्या असंख्य भाविकांनी श्रीदेव कोळंबाचे मनोभावे दर्शन घेतले. तत्पूर्वी रविवारी सकाळी मानकरी ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्री देव कोळंबाची विधिवत पूजाअर्चा झाल्यानंतर या यात्रोत्सवास प्रारंभ झाला. यात्रोत्सवासाठी भाविकांची सकाळपासून आगमन होत होते. सकाळच्या सुमारास यात्रा परिसर नवस फेडण्यासाठी श्रीफळासह कोंबडी,बकरे घेऊन भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.तर भाविकांनी सूर्योदयापासून श्री देव कोळंबाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांग लावली होती.

दुपारच्या वाढत्या उन्हाबरोबरच गर्दी वाढू लागल्याने दर्शनाची रांगही लांबलचक झाली होती. यानंतर नवीन नवस बोलण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. यावर्षी कोळंबा यात्रेसाठी जिल्ह्यातील भक्तांबरोबर मुंबईकर चाकरमानी, विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते, पदाधिकारी, पर्यटक, इतर राज्यातील भाविकांनी हजेरी लावत कोळंबा यात्रेसाठी एकच गर्दी केली होती.यात्रोत्सवास येणा-या भाविकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय जाणवू नये यासाठी श्री देव कोळंबा देवस्थानचे अध्यक्ष नागेश मोरये व नांदगाव ग्रामस्थांनी यात्रेचे परिपूर्ण नियोजन केले होते.यावेळी वाहनासाठी पार्किंग व्यवस्था, दर्शनासाठी रांगेची व्यवस्था,विविध वस्तू व खाद्याची दुकाने, ठिकठिकाणी,आरोग्य केंद्राचे पथक,स्वयंसेवक यामुळे यात्रेमध्ये सुरळीपणा जाणवत होता. यात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक मंडप व विद्युत रोषणाई करून मंदिर परिसर झळाळून निघत भक्तांचा जनसागर ऊसळला होता.