
कुडाळ : कोकण कला व शिक्षण विकास संस्था तसेच संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने १ डिसेंबर “जागतिक एड्स दिन” निमित्त आरोग्यजागृतीचा संदेश देणाऱ्या प्रभावी रॅलीचे आयोजन करण्यात आले.
जागतिक एड्स दिनानिमित्त कुडाळ शहरात आयोजित या भव्य रॅलीने एचआयव्ही/एड्सविषयीची वैज्ञानिक समज, प्रतिबंधक उपायांची गरज आणि रुग्णांबद्दलची सामाजिक जबाबदारी याबाबत नागरिकांचे भान अधिक मजबूत केले. यंदाचे घोषवाक्य ‘एड्समुक्तीचा निर्धार, आरोग्याचा अधिकार’ घेऊन निघालेल्या या रॅलीला स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सकाळी ९.३० वाजता संत राऊळ महाराज महाविद्यालयातून रॅलीचा शुभारंभ प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाला. यावेळी महाविद्यालयाचे एनसीसी प्रमुख डॉ. एस. टी. आवटे, एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. भावेश चव्हाण, प्रा. सभा शहा, प्रा. प्रणव तेंडोलकर, डॉ. योगेश कोळी, डॉ. कमलाकर चव्हाण तसेच संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक श्री. अमित पाटील, समुपदेशक श्री. समीर शिर्के, प्रकल्प सहाय्यक सौ. अवंती धुरी, श्री. शुभम लोनागरे तसेच जिल्हा रुग्णालय ओरस येथील समुपदेशक श्री. मानसिंग पाटील उपस्थित होते.
महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि आरोग्य कर्मचारी हातात एड्स प्रतिबंधक संदेश फलक घेऊन सहभागी झाले होते. “एचआयव्हीबद्दल जाणून घ्या, गैरसमज टाळा”, “सुरक्षितता बाळगा, जीवन वाचवा” अशा घोषणांनी शहराची मुख्य बाजारपेठ, तहसील चौक परिसर जागवला. दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे रॅली अधिक प्रभावी ठरली.
समारोप प्रसंगी श्री. मानसिंग पाटील म्हणाले, “एचआयव्ही/एड्स आता असाध्य नसून अँटीरेट्रोव्हायरल थेरपी उपचारामुळे रुग्ण पूर्णपणे सामान्य आयुष्य जगू शकतात. समाजाने सहानुभूतीची भावना वाढवून या लढ्यात सहभागी होणे अत्यंत आवश्यक आहे.”
या रॅलीमुळे स्थानिक नागरिक आणि युवकांमध्ये एचआयव्ही/एड्ससंदर्भातील योग्य माहिती, प्रतिबंधाची जाणीव आणि सामाजिक स्वीकाराची भावना वाढीस लागली. तसेच आरोग्यसेवा घेण्याबाबतचा सकारात्मक दृष्टिकोन दृढ झाला असून, समाजात जबाबदारीची आणि संवेदनशीलतेची भावना निर्माण करण्याचे उद्दिष्ट यामुळे प्रभावीपणे साध्य झाले.










