गाळ उपसण्यासाठी आदेश असतानाही प्रशासनाकडून चालढकल

आमदार निलेश राणेंकडून न्यायाची अपेक्षा
Edited by:
Published on: April 05, 2025 18:57 PM
views 30  views

कुडाळ : सरकार काम आणि 1 0 वर्षे थांब अशीच काहीशी अवस्था नारुर येथील पीडित शेतकरी मधुकर तेरसे यांची झाली आहे. तेरसे यांची भातशेती आणि घर नदीलगत असून पावसाळ्यात येथील गडनदीला येणार्‍या पुरामुळे त्यांचे मागील दहा वर्षांपासून नुकसान होत आहे.

मागच्या दोन ते वर्षांपासून येथील नदीचे पात्र रुंदावत असून नदीतील गाळ हा शेतात जाऊन नुकसान होत आहे. तर नदीलगतचा भाग कोसळल्याने पावसाळ्यात पुराचे पाणी घरात शिरण्याचा धोका उत्पन्न झाला आहे. मागच्या अनेक वर्षांपासून ही समस्या असून तेरसे यांनी वारंवार याबाबत प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. पंचनामे झाले, सदर ठिकाणचा गाळ काढणे आणि संरक्षक भिंत बांधणे असा सरकारी आदेशही आला आहे. मात्र, याची कोणीही दखल घेतलेली नाही. स्थानिक ग्रामपंचायतीकडूनही सहकार्य याकामी मिळालेले नाही. पाऊस तोंडावर आला असून येत्या आठवडाभरात काम सुरू केले नाही, तर यावर्षीही त्यांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. तेरसे यांनी आतापर्यंत स्थानिक ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, गटविकास कार्यालय आणि शेवटी पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन सादर केले आहे. आता पालकमंत्री नितेश राणे आणि स्थानिक आमदार नीलेश राणे यांनी तरी लक्ष घालून हे काम तातडीने करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

नारुर हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेले गाव असून येथील गडनदीला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पूर येतो. गेल्यावर्षी तर नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत नदीला मोठा पूर येऊन येथील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. येथील नदीलगतचे मधुकर तेरसे यांच्या प्रमाणेच अन्य 50 ते 60 शेतकरी असून त्यांचेही वर्षानुवर्षे नुकसान होत आहे. नुकसान झाले की पंचनामा होतो. मात्र, ज्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्या नुसार नुकसान भरपाई मिळत नाही. याचा अनुभव येथील शेतकरी मधुकर तेरसे यांना अनेकवेळा आला आहे. मागच्या 10 ते 15 वर्षांपासून ते या नुकसानीचा सामना करत आहेत. तसेच गेल्या दहा ते 15 वर्षांपासून ते स्थानिक पातळीपासून ते तालुका, जिल्हा पातळीवरील प्रशासनाकडे त्यांनी अर्ज केले आहेत. अर्जाची दखल घेतली जाते. स्थानिक पातळीवर गाळ काढा, संरक्षक भिंत बांधा असे आदेश दिले जातात. मात्र, प्रत्यक्षात काहीच काम होत नाही. याला जबाबदार कोण, प्रशासन की, लोकप्रतिनिधी? असा प्रश्न आता उद्भवू लागला आहे. 

दरम्यान, पावसाला आता सुरुवात झाली आहे. मागच्या दोन ते तीन दिवसांपासून नारुर गावात पाऊस कोसळत आहे. मात्र, प्रत्यक्षात पावसाला अजून दोन महिने असले तरी येत्या आठ दिवसांत या कामाला सुरुवात झाली नाही, तर हे काम यंदाच्या वर्षीही रखडणार आणि तेरसे यांच्याप्रमाणेच इतर 50 ते 60 शेतकर्‍यांचे नुकसान होणार आहे. तरी स्थानिक आमदार नीलेश राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी यात लक्ष घालावे आणि येथील शेतकरी न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी मधुकर तेरसे यांनी केली आहे.