
सावर्डे : स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत फुटबॉल असोसिएशन ऑफ रत्नागिरी जिल्हा आयोजित १३ वर्षा खालील खेलो इंडिया फुटबॉल लीगचे विजेतेपद डेरवण फुटबॉल क्लबने मिळवले. सेंट थॉमस फुटबॉल अकादमीचा संघ उपविजेता व सेक्रेट हार्ट कॉन्व्हेन्ट फुटबॉल क्लबला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. २४ डिसेंबर २०२४ रोजी सुरू झालेली अस्मिता खेलो इंडिया फुटबॉल लीग तीन टप्प्यांत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत वरील संघासह दापोली फुटबॉल क्लब, लांजा फुटबॉल क्लब व मेरी माथा फुटबॉल अकादमी असे सहा संघ सहभागी झाले होते.
स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी प्रमुख पाहुण्या डॉ. अमृता बालकवडे, प्रतिनिधी, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी खेळाडू मुलींचे कौतुक केले. आपल्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया कायम अशा स्पर्धांकरिता सहकार्य करत राहिल अशी ग्वाही दिली. खेलो इंडिया अंतर्गत आयोजित फुटबॉल स्पर्धेमुळे रत्नागिरी जिल्ह्यात दर्जेदार खेळाडू घडवण्यासाठी मदत होईल असे मत एसव्हीजेसीटी स्पोर्ट्स अकादमी चे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत पराडकर यांनी प्रदर्शित केले. श्री.धनराज मोरे यांनी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन कायम रत्नागिरी जिल्हा फुटबॉल असोसिएशन च्या पाठिशी खंबीरपणे उभी राहील अशी ग्वाही दिली.
फुटबॉल असोसिएशन ऑफ रत्नागिरीचे प्रसाद परांजपे अध्यक्ष, धनराज मोरे सचिव, विनोद म्हस्के उपाध्यक्ष, नितेय वाघदरे यांच्या प्रयत्नामुळे ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली. सेंट थॉमस इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक फादर जॉर्ज, एसव्हीजेसीटी स्पोर्ट्स अकादमी डेरवण चे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत पराडकर, सेक्रेड हार्ट अकादमी चे श्री.गावडे व सेंट थॉमस अकादमीचे अजित धावडे यांचे विशेष सहकार्य लाभले.