मळगावातील समस्यांबाबत उपकार्यकारी अभियंतांची भेट

Edited by: विनायक गांवस
Published on: June 19, 2025 19:22 PM
views 71  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथे गेले अनेक दिवस विजेच्या समस्या वाढत आहेत. दिवसा वीज खंडित होते. परंतु, अलीकडे दररोज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. गावात अनेक ठिकाणी कमी दाबाचा वीज पुरवठा होणे, मोडकळीस आलेले खांब बदलणे आवश्यक आहे आणि कमी उंचीचे वीजेच्या खांबांमुळे विद्युत वाहिन्या लोंबकळत आहेत. उद्योग व्यावसायिकांना विजेच्या खेळखंडोबामुळे नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. नवीन सब स्टेशनची आवश्यकता, मळेवाड येथून येणारी वीज वाहिनी लवकरात लवकर जोडणी होणे अशा अनेक वीज समस्या घेऊन महेश खानोलकर यांच्या नेतृत्वाखाली मळगाववासियांनी सावंतवाडी उप कार्यकारी अभियंता श्री शैलेश राक्षे यांची भेट घेतली.


 उपकार्यकारी अभियंत्यांनी येत्या दहा दिवसात मळगाव येथील समस्या सोडवून अखंडित वीज पुरवठा सुरू करतो असे आश्वासित केले. यावेळी सहाय्यक अभियंता खांडेकर, जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय लाड, सचिव दीपक पटेकर, संजय तांडेल, प्रमोद राऊळ, सहदेव राऊळ, राजू निरवडेकर, राजन राऊळ, स्वप्नील ठाकूर आदी उपस्थित होते. सावंतवाडी शहराच्या शेजारील मोठी बाजारपेठ म्हणून मळगाव ओळखली जाते. परंतु, मळगाव येथील व्यापारी, उद्योजक, घरगुती वीज ग्राहकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. बाजारपेठेतील दत्त मंदिर जवळील तसेच शिवाजी चौकातील खराब झालेले वीज खांब तातडीने बदलून ९ मीटरचे लोखंडी खांब बसविणे आवश्यक आहे. घाटातील जंगलमय भागातून रात्री अपरात्री वारंवार खंडित होणारी वीज, कमी दाबाचा वीज पुरवठा आणि या सर्व समस्यांचे योग्य निराकरण व्हायचे असेल तर लवकरात लवकर मळगाव पंचक्रोशीत सब स्टेशन उभारणे ही काळाची गरज. या सर्व विषयांवर उपकार्यकारी अभियंता व सहाय्यक अभियंता यांच्याशी समाधानकारक चर्चा झाली. मळेवाड येथून येणारी लाइन दहा दिवसात पूर्ण करून घेण्यासह बाजारपेठे व इतर आवश्यक त्या जागी नवीन लोखंडी खांब तात्काळ उभारून उर्वरित समस्या सुद्धा लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन उपकार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांनी दिले. सबस्टेशन बाबतच्या तांत्रिक बाबी दूर झाल्यास ते सुद्धा मार्गी लावून घेण्याचे आपले प्रयत्न असल्याचे त्यांनी सबस्टेशबाबतच्या प्रश्नावर बोलताना सांगितले. अधिकाऱ्यांच्या सकारात्मक प्रतिसादावर वीज ग्राहकांनी समाधान व्यक्त केले.