
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संगमेश्वर दौऱ्यानिमित्त चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे असलेल्या सह्याद्री पॉलिटेक्निक या कॉलेजला रविवारी सदिच्छा भेट दिली.
या भेटीचे औचित साधून विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्ट प्रदर्शनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या विविध विषयांवरील नावीन्यपूर्ण आणि सर्जनशील प्रोजेक्ट्स उपमुख्यमंत्री महोदयासमोर सादर केले. विद्यार्थ्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, यांसारख्या विविध क्षेत्रांतील प्रकल्पांद्वारे आपली कौशल्ये आणि कल्पकता दर्शवली. यामध्ये नारळ पाणी संकलन उपकरण, अगदी सोप्या पद्धतीने शहाळे कटिंग करणारे मशीन, थ्रीडी प्रिंटिंग मशीन यामध्ये तर दादांचे चित्र अवघ्या सात मिनिटांमध्ये काढण्यात आले . त्याचबरोबर उसाच्या चिप्पाडापासून विटा तयार करण्यात आल्या होत्या, एका तासामध्ये चार्जिंग करून 40 किलोमीटर पळणारे इलेक्ट्रिक स्कूबी असे प्रोजेक्ट मांडण्यात आले होते.
या भेटी दरम्यान सह्याद्री पॉलिटेक्निकचे प्राचार्य मंगेश भोसले यांनी अजित दादा यांना आपल्या कॉलेज च्या सर्वोत्कृष्ट कामगिरी विषयी आणि विद्यार्थ्यांना शिकत असतानाच दिल्या जाणाऱ्या नोकरीच्या संधी संदर्भात माहिती दिली.यावेळी अजितदादा यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची सखोल माहिती घेवून त्यांची प्रशंसा केली आणि त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प सादर करताना त्यांच्या कामाची महत्त्वता आणि भविष्यातील योजनांची माहिती दिली.
प्रशिक्षक आणि मार्गदर्शक शिक्षकांचे आणि प्रदर्शन आयोजक प्रा.साईराज देवरुखकर यांचे देखील कौतुक करताना, असे प्रकल्प विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी उपयुक्त ठरतात असे मत त्यांनी व्यक्त केले. या भेटीप्रसंगी चिपळूण- संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार व सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर गोविंदराव निकम उपस्थित होते.
अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अनुभवी आणि दूरदृष्टीचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी अर्थमंत्री, जलसंपदा मंत्री अशा अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. ग्रामीण भागातील तंत्रशिक्षण संस्थांच्या प्रगतीसाठी त्यांचा नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन राहिला आहे. या भेटीदरम्यान अजितदादा यांनी विद्यार्थ्यांशी केलेला संवाद आणि कौतुक प्रथमच कोकणवासीयांना पाहावयास मिळाला .