
सावंतवाडी : तालुक्यात मागील दोन आठवड्यात डेंग्यू व मलेरिया चे रूग्ण अधिक प्रमाणात आढळुन येत आहेत. तालुक्यात आतापर्यंत जवळपास ११ रूग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. यात ग्रामीण भागाचा समावेश अधिक आहे. तर शहरात डासांचा वाढलेला प्रादुर्भाव व रोगराईचे वाढते प्रकार लक्षात घेऊन वेळीच उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सावंतवाडी तालुक्यातील मागील काही दिवसांत प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालयात डेंग्यू, मलेरियाचे रूग्ण उपचारांसाठी दाखल होत आहेत. त्यांच्या तपासणीत रूग्ण डेंग्यू, मलेरिया पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागात बहुतांश रूग्ण आढळून आले आहेत. सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात ५ तर प्राथमिक बांदा आरोग्य केंद्रात १ डेंग्यूचा रूग्ण उपचार घेत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर यांनी दिली. तसेच उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे तालुक्यातील डेंग्यूचे ४ व मलेरीयाचा १ रूग्ण उपचार घेत असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी दिली आहे.
दरम्यान, वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी प्रशासनासह नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. पावसाचं पाणी साचणार नाही, डबकी निर्माण होऊन डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केले आहे. तर ताप किंवा अशक्तपणा जाणवल्या तातडीनं जवळच्या सरकारी रूग्णालयात जाऊन तपासणी करावी, आजारपण अंगावर काढू नये. डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपचार घ्यावे असे आवाहन डॉ. ऐवळेंनी केलं आहे.