
देवगड : माजी खासदार विनायक राऊत यांनी जाहीर सभेत राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांचा जाहीर सभेत अर्वाच्य भाषेत उल्लेख करणारे विधान केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या विरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करावा,अशी मागणी हिंदळे येथील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश राणे यांनी देवगड पोलीस निरीक्षकांकडे निवेदनातून केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी देवगड पोलीस ठाणे अंमलदार यांच्याकडे सुपुर्द केले.
श्री.राणे यांनी निवेदनात म्हटले आहे, दोन दिवसांपूर्वी राजापूर येथे झालेल्या जाहीर सभेत माजी खासदार विनायक राऊत यांनी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांना अर्वाच्य भाषा वापरून त्यांचा उल्लेख केला आहे. याबाबतचे व्हिडिओ यूट्यूबवर आहेत. त्यामुळे माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी,असे म्हटले आहे. यावेळी हिंदळे येथील भाजपा कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.