कळसुलकर शेजारील ओहोळ बंदीस्त करण्याची मागणी

Edited by: विनायक गांवस
Published on: August 08, 2024 13:24 PM
views 190  views

सावंतावडी : कळसुलकर इंग्लिश स्कूल प्रशालेच्या गेट समोरील बाजूच्या ओहोळावर स्लॅब घालून विधानसभा अध्यक्ष अॅड. राहूल नार्वेकर यांच्या सालईवाडा येथील निवासस्थानापर्यंत ओहोळ बंदीस्त करण्याबाबतची मागणी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केली. या स्लॅबमुळे प्रशालेच्या विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा होणारा त्रास कमी होईल तसेच दुचाकी वाहनांना पर्यायी मार्ग, पार्किंगसाठीची व्यवस्था होईल. यातून शहरातील वाहतूक कोंडींचा प्रश्न देखील सुटेल असे श्री. सुर्याजी म्हणाले. मंत्री केसरकर यांनी त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला.

कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.वी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी ही शाळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जुनी व नामवंत शाळा असून या शाळेला १२२ वर्षे पूर्ण झाली आहेत. या शाळेचा विचारकरता प्रशालेमध्ये बालवाडी पासून ते उच्चमाध्यमिक विभागापर्यंत शाखा आहेत. प्रशालेत सुमारे ९५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तसेच ही प्रशाला शहराच्या मध्यवर्ती आहे. या शाळेच्या प्रवेशद्वारासमोर ओहोळ असून तो बंदिस्त नाही. त्यामुळे हा ओहोळ स्लॅब घालून बंदिस्त करण्यात यावा. ओहोळाच्या बाजूच्या इमारतीमध्ये शाळेचा प्राथमिक विभाग असून त्या ठिकाणी इ. १ ते ४ चे वर्ग बसतात. ओहोळ उघडा असल्याने काही लोक कचरा त्यामध्ये टाकतात. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरते. यातून विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका संभवतो. त्यामुळे पालकामाधुनही वारंवार विचारणा होत आहे.

विद्यार्थांचा आरोग्याच्या हिताचा विचार करून प्रशालेच्या गेट समोरील बाजूच्या ओहोळावर स्लॅब घालून तो बंद करण्यात यावा.बाजुला मच्छी मार्केट असल्याने रहदारी चा मार्ग आहे याचा उपयोग छोट्या दुचाकी वहानांच्या पार्किंगसह वाहतूक कोंडी दुर होण्यास उपयुक्त आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी देखील कमी होईल. याकरीता मागणीचा विचार करावा अस आवाहन युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केल. याला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी प्रथमेश प्रभू आदी उपस्थित होते.