'त्या' सुरक्षारक्षकांची चौकशी करण्याची मागणी

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 04, 2023 19:12 PM
views 100  views

देवगड : देवगड बंदरात मत्स्य व्यवसाय विभागामार्फत नियुक्त करण्यात आलेले सुरक्षारक्षक हे नेमणूक दिलेल्या ठिकाणी अनुपस्थित राहतात. प्रसंगी काम चुकारपणा करतात ही बाब प्रामुख्याने निदर्शनास आली आहे. याबरोबरच ते आपल्या पदाचा गैरवापर करत प्रसंगी दमदाटी करून व खोल समुद्रात नौका मालकांना धमकावून माशाची लूट करतात आणि नौका मालकांची आर्थिक पिळवणूक करतआहेत अशा प्रकारच्या वाढत्या तक्रारी येत आहेत.

त्याच प्रमाणे आपली नियोजित सेवा नियुक्त केलेल्या ठिकाणी करीत नसून कार्यात कसूर करत आहेत, ही बाबही सत्य असून या संदर्भात आपल्या मत्स्य व्यवसाय विभागामार्फत त्या काम चुकार सुरक्षारक्षकांची सखोल चौकशी करण्यात येऊन कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा स्थानिक मच्छीमार व नौका मालकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पारंपारिक स्थानिक मच्छीमार व नौका मालक यांच्या वतीने आयुक्त मत्स्यव्यवसाय विभाग जिल्हा आयुक्त कार्यालय सिंधुदुर्ग यांना लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

या निवेदनावर सुमारे ५० हुन अधिक पारंपरिक मच्छिमार नौका मालक यांनी स्वाक्षरी केली असून स्थानिक मच्छिमार व नौका मालक आदी यावेळी उपस्थित होते.