
दोडामार्ग : तिलारी खोऱ्यात हत्ती पकड मोहीम राबवा तसेच ही मोहीम राबविल्यानंतर हत्ती पुन्हा येणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करा या मागणीसाठी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व शेतकऱ्यांनी दोडामार्ग वनविभाग कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळी बेमुदत उपोषणास सुरुवात केली. पालकमंत्री नितेश राणे व आमदार दिपक केसरकर यांनी आश्वासन दिल्याने दुसऱ्या दिवशी रात्री उशिरा उपोषण मागे घेण्यात आले.
तिलारी खोऱ्यात हत्तींचा वाढता वावर पाहता ग्रामस्थांसह शेतकरी कमालीचा धास्तावला आहे. येथे वावरत असणाऱ्या हत्तींच्या कळपात लहान पिल्ले आहेत. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकरी वर्गात कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण पिल्लांच्या संरक्षणासाठी हे हत्ती मनुष्यावर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय अशा अनेक घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. या हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार करून देखील याकडे दुर्लक्ष होत आहे. सध्या काजू हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकरी काजू बागायतीत वावरताना दिसत आहेत. मात्र हत्तींचा वाढता वावर पाहता पाहता काजू बागायतीत जाण्यास शेतकरी घाबरत आहेत.
हत्तींच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांनी काजू बागायतीकडे पाठ फिरवल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे वर्षभर मेहनत घेतलेले काजू पिक ऐन हंगामात हत्तींमुळे मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप पसरला आहे. त्यामुळे या परिसरात हत्ती पकड मोहीम राबवा अशी मागणी स्वराज्य सरपंच सेवा संघ जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांसह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व शेतकऱ्यांनी वनविभागाकडे निवेदनाद्वारे केली होती. मात्र मागण्या पूर्ण न झाल्याने शुक्रवारी सकाळी येथील वनविभाग कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली. या उपोषणात प्रवीण गवस यांसह, हेवाळे सरपंच साक्षी देसाई, साटेली भेडशी सरपंच छाया धर्णे, तेरवण मेढे सरपंच सोनाली गवस, कोलझर सरपंच सुजल गवस, हेवाळे उपसरपंच समीर देसाई, मोर्ले उपसरपंच संतोष मोर्ये, माजी सरपंच सुजाता मणेरिकर, राजाराम देसाई, गुरू देसाई यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शेतकरी सहभागी झाले. या उपोषणाला विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देत पाठिंबा दर्शविला.
प्रधान मुख्य वनसंरक्षकांवर शेतकऱ्यांचा रोष
दुसऱ्या दिवशी रात्री उशिरा प्रधान मुख्य वन संरक्षक एन. रामानुजन यांनी उपोषणस्थळी भेट दिली असता त्यांच्यावर उपोषणकर्त्यांनी अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी एन. रामानुजन म्हणाले की, कर्नाटकातून हत्ती पकड मोहिमेतील तज्ञ टीम या भागात आणण्यासाठी आपण वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करत आहे. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून परवानग्या मिळताच ही मोहिम राबवणे शक्य होईल, असे त्यांनी उपोषणकर्त्यांना सांगितले. सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने सकारात्मक आहे. त्यामुळे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण नक्की प्रयत्न करणार असे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे व माजी शिक्षणमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांनी उपोषणकर्त्यांना दिल्याने रात्री उशिरा उपोषण मागे घेण्यात आले.