
सावंतवाडी : शहरातील रस्त्यालगतची धोकादायक असलेले झाडं तोडून घेण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक राजू बेग यांनी सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. बेग यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, सावंतवाडी नगरपरिषद हद्दीमध्ये माठेवाडा काझिदिंडी - परिसरात वागळे दुकानानजिक मुंबईस्थित महंमद रफिक काझी यांच्या मालकीच्या जागेतील एक आंब्याचे झाड मुळालगत अत्यंत जीर्ण झालेले आहे. हे झाड रस्त्यालगत धोकादायक अवस्थेत असल्याने तात्काळ तोडून घेण्याबाबत तेथील नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. नागरिकांच्या जिवितास धोका असल्याने नागरिकांच्या मागणीनुसार १५ जून २०२३ च्या अर्जाने नगरपरिषदेस आपण कळविले होते. त्यानंतर झाडाचे मालक महंमद काझी यांना तीन जुलै २०२३ च्या पत्राने नगरपरिषदेने कळविलेले होते. परंतु, अद्यापपर्यंत या झाडाबाबत कोणतीच उपाययोजना करण्यात आल्याचे दिसून येत नाही. आता पावसाळा तोंडावर आल्याने झाड पडून जिवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. झाड मोडून जिवित व वित्तहानी झाल्यास त्यास सर्वस्वी नगरपरिषद जबाबदार राहील असा इशारा बेग यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.