
देवगड : देवगड येथिल शिक्षण विकास मंडळ चालवित असलेल्या बीएड कॉलेज व केळकर कॉलेजवर प्रशासक नेमावा अशी मागणी देवगडमधील ग्रामस्थांनी केली आहे.या मागणीची गंभीर दखल घेवून उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ.वि जय नारखेडे यांनी देवगड येथे येवून तक्रारदार ग्रामस्थ व कार्यालयीन कर्मचारी यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी भेट दिली. यावेळी काही विद्यार्थ्यांचे पालकही उपस्थित असल्याची माहिती देवगडमधील ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला मुख्य तक्रारदार प्रकाश वसंत लळीत, निशिकांत साटम, विलास रूमडे, योगेश चांदोस्कर, अ.द.बलवान आणि विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.या पत्रकार परिषदेमध्ये शिक्षण विकास मंडळाबाबत केलेल्या तक्रारीची माहिती उपस्थितांनी दिली. यामध्ये धर्मादाय आयुक्तांकडून गेली १० वर्षे शिक्षण विकास मंडळाच्या संचालक मंडळाला मान्यताच नसल्याचे नमुद करण्यात आले आहे. यामुळे विद्यमान संचालक मंडळाला धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत.स.ह.केळकर कला व वाणिज्य महाविद्यालयास गेली आठ वर्षे कायमस्वरूपी प्राचार्य नेमलेले नाहीत.यामुळे शासकीय नियमांचा व मुंबई विद्यापीठाच्या परिनियमांचा भंग झाला असून महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा ढासळला आहे. याच संस्थेचे शा.कृ. पंतवालावलकर अध्यापक महाविद्यालयाला आजच्या घडीला प्राचार्य व एकही प्राध्यापक याची मान्यता घेण्यात आलेली नाही.तेथे नियमित शैक्षणिक कामकाज होत नाही. केवळ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असून थेट परीक्षेला बसू दिले जाते. अशाप्रकारे हे अध्यापक महाविद्यालय सर्व नियमांचा भंग करून चालविले जात आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रायोजित अभ्यासक्रमांतर्गत जे अभ्यासक्रम चालु करण्याची परवानगी महाविद्यालयाला दिली होती.यामध्ये विद्यार्थ्यांची घोर फसवणूक झालेली आहे.हे कोर्स सुरू करण्यात आले मात्र त्यावेळी या कोर्सना मेडीकल कौन्सिल अथवा विद्यापीठ यांची परवानगीच घेतली नाही. अशाप्रकारे हेल्थ केअर आणि हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम असे दोन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. मात्र त्यांना अधिकृत सर्टिफिकेट देण्यात आली नाहीत. सध्या हे विद्यार्थी बेकार असून यातील हेल्थ केअर हा अभ्यासक्रम नर्सींग समकक्ष असल्याचे सांगण्यात आले यामुळे विद्यार्थ्यांची व पालकांची दिशाभुल झाल्याचे म्हणणे आहे. पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या पालकांनी आपण या विरोधात आंदोलन छेडणार असल्याचे म्हटले.याचप्रकारे यंदाच्या वर्षापासून सीबीएससी बोर्डाचे स्कूल सुरू करणार असल्याची जाहीरात संस्थेकडून करण्यात येत आहे. मात्र त्याला सीबीएससी बोर्डाची मान्यता आहे की नाही याची तपासणी पालकांनी प्रवेश घेण्याआधी करावी. असा धोक्याचा इशारा देवगड ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत दिला. याप्रकरणात विद्यार्थ्यांचा प्रश्नांना महाविद्यालयाने समर्पक उत्तरे न दिल्यास सर्व आघाडयांवर लढून लढा उभा करणार असल्याचे योगेश चांदोसकर यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले. गेले सहा वर्षे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. काही अभ्यासक्रम विद्यार्थी संख्येअभावी बंद करण्याची नामुष्की संस्था प्रशासनावर आली आहे.या शैक्षणिक वर्षासाठी विज्ञान विभागाच्या अनुदानीत विभागामध्ये ९ विद्यार्थ्यानीं प्रवेश घेतला असून केवळ पाच विद्यार्थी हे नियमित आहेत. विज्ञान विभागाच्या भौतिक शास्त्र व गणित विषयासाठी केवळ एका विद्यार्थीनीने प्रवेश घेतला आहे. गेली ३५ वर्षे देवगडमधील सर्वसामान्य कुटूंबातील हजारो विद्यार्थ्यांना विज्ञान विषयातील शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणारे हे महाविद्यालय, त्याचा अनुदानित विज्ञान विभाग संस्थेच्या कारभारामुळे बंद पडण्याचा मार्गावर आहे. विनाअनुदानीत अभ्यासक्रमांमध्ये आथिक र्गैरव्यवहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पुरेसे प्राध्यापक न नेमणे, नियमानुसार प्राप्त झालेल्या शैक्षणिक शुल्काचा विनियोग त्या त्या कारणासाठी न करता संस्थेच्या इतर खर्चासाठी वळविणे इत्यादी गैरव्यवहार करण्यात आले आहेत.
एकेकाळी नॅक मानांकनानुसार सिंधुदूर्ग रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकावर असलेले केळकर महाविद्यालय २०१९ मध्ये बी ग्रेडमध्ये गेले व या बी ग्रेडची मुदत २०२४ मध्ये संपल्यामुळे हे महाविद्यालय नॅकच्या दृष्टिने नॉनअँक्रेडिटेड या शासनाच्या यादीमध्ये अंतर्भुत झाले आहे.हे सर्व मुद्दे उच्च
शिक्षण सहसंचालक डॉ.विजय नारखेडे यांच्यासमोर आपण मांडले असल्याचे उपस्थित ग्रामस्थांनी सांगीतले असून देवगड शिक्षण विकास मंडळाच्या संचालकांच्या कारभाराबद्दल सर्वच स्तरातून लढा उभा करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगीतले. देवगड कॉलेज वाचविण्यासाठी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी आपणाला साथ द्यावी असे आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले.