कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मागणी

Edited by: संदीप देसाई
Published on: January 21, 2024 12:11 PM
views 145  views

दोडामार्ग : शवविच्छेदन कक्षाच्या पाठीमागील बाजूस जमा असलेल्या कचऱ्याची विल्हेवाट करण्यात यावी. व यापुढे तेथील परिसर स्वच्छ ठेवावा अशी मागणी उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली - भेडशीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांच्याकडे एक निवेदन देत केली आहे. 

दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले की,  प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी येथील शवविच्छेदन करण्यात येणाऱ्या कक्षाच्या पाठीमागे शवविच्छेदन केल्यानंतर या प्रक्रियेमध्ये वापरलेले साहित्य हे उघड्यावर टाकले जाते. याचा त्रास बाजूच्या लोकवस्तीला होत आहे.

येथील बाजूलाच लागून एक चर्च आहे. या चर्चच्या परिसरात पिण्याच्या पाण्याची विहीर असून त्या विहिरीचे पाणी आजूबाजूचे लोक, तसेच हॉटेल व्यावसायिकही वापरत असतात. आपण वापरलेले साहित्य व कपडे वैगरे कुत्रे व इतर प्राणी आजूबाजूला फेकून देतात. हि गोष्ट लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर आहे. त्यामुळे सदर परिस्थितीची तात्काळ पाहणी करून या कचऱ्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यावेळी महिला उपजिल्हा प्रमुख विनिता घाडी, विभागप्रमुख जेनिफर लोबो, युवा तालुकाप्रमुख गौरवी नाईक, माजी पं. स. सभापती सुनंदा धरणे, युवा उपविभागप्रमुख सचिन केसरकर आदी उपस्थित होते.