
बेळगाव : बेळगावमधील होलसेल मासळी व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला बेळगाव शहरात होलसेल मासळी बाजारासाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात झालेल्या एका बैठकीनंतर होलसेल मासळी व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन सादर केले. बेळगाव उत्तरचे आमदार असीफ (राजू) सेट व पोलीस आयुक्त भूषण बोरसे या वेळी उपस्थित होते.
“बेळगाव होलसेल मासळी बाजार हा दक्षिण भारतातील आघाडीच्या घाऊक बाजारांपैकी एक आहे. बेळगाव शहर हे दक्षिण भारतातील प्रमुख घाऊक बाजार असून उत्तर कर्नाटक, दक्षिण महाराष्ट्र आणि शेजारील भागातील किरकोळ व्यापाऱ्यांना येथेून मोठ्या प्रमाणात ताजी व. सुकी मासळी पुरवली जाते. भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बेळगावात गोवा, कर्नाटक व महाराष्ट्रातील किनारपट्टी भागातून मोठ्या प्रमाणात मासळी येते. हंगामाच्या काळात दररोज पहाटे सुमारे 100 टन मासळी येथे येते,” असे निवेदनात नमूद केले आहे.
मात्र, शहरात घाऊक भाजीपाला व फळ बाजाराप्रमाणेच स्वतंत्र घाऊक मासळी बाजार नसल्याने व्यापाऱ्यांना सध्या भरतेश कॉलेजसमोरील बेळगाव छावणी मंडळाच्या पार्किंग जागेत तात्पुरता व अत्यंत गैरसोयीचा ठिकाणी व्यवहार करावा लागतो. प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
यावर जिल्हाधिकारी रोशन व आमदार सेट यांनी प्रत्यक्ष पाहणी करून लवकरच योग्य ठिकाण उपलब्ध करून देण्याचे आश्वासन प्रतिनिधींना दिले. संघटनेचे अध्यक्ष गिरगोल रॉड्रिग्स, उपाध्यक्ष सिरील कार्व्हालो, अल्ताफ पाडेकर, लुईस कार्व्हालो, युसुफ बारगीर, मुन्ना मदर, नजीम आदी सदस्य या वेळी उपस्थित होते.