नारायण तलावाचे पुनरूज्जीवन करण्याची मागणी | उमेश येरम यांनी वेधले लक्ष

Edited by: दिपेश परब
Published on: June 25, 2023 18:54 PM
views 467  views

वेंगुर्ले : ब्रिटीश काळापासून वेंगुर्ला शहरांस पाणी पुरवठा करणारा नैसर्गिक झऱ्याच्या माध्यमातून पाणी साठा होणारा नारायण तलावाच्या दक्षिणेकडील भिंतीवर (धरणाच्या बंधारावर) असलेल्या झाडांच्या पाळांमुळे तलावातील पाणी वाहून जात आहे. अनेक वर्ष या बंधाऱ्यास झालेली आहेत. उन्हाळी पाणी टंचाई व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी मिटविण्यासाठी या तलावाची दक्षिणेकडील भिंत नवीन बांधणे, इतर डागडुजी व तलावातील गाळ काढण्यासाठी निधी उपलब्द करून देण्याची मागणी शिवसेनेचे वेंगुर्ले शहर प्रमुख उमेश येरम यांनी, स्थानिक आमदार, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचेकडे केली आहे.

दरम्यान, या नारायण तलावाकडील पाण्याच्या विहिरीतून निमुसगा येथील नळपाणी योजनेसाठी बांधलेल्या पाण्याच्या टाकीत पाईपव्दारे पाणी भरले जाते. व उंच भागांत असलेल्या घरांना ते पुरविले जाते. नारायण तलावात पाणी साठा रहात नसल्याने या नळपाणी योजनेत समस्या निर्माण होते. त्यामुळे हे काम प्राधान्याने दिपक केसरकर यांनी करावे अशी मागणी त्या परीसरातील नागरीकांतून होत आहे.

ब्रिटीश काळापासून वेंगुर्ले शहरास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या नारायण तलाव हा नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत्र आहे. या तलावाच्या तीन बाजूला डोंगर भाग आहे तर एक दक्षिणेकडे असलेला भागास तलावात पाणी साठा वाढला तर ते सोडण्यासाठी दरवाजा आहे. या तलाव कम धरणांस अनेक वर्षे झाल्याने ते जीर्ण झालेले आहे. तसेच या धरणाच्या (तलावाच्या) दक्षिणेकडील बंधाऱ्यावर (भिंतीवर) झाडे वाढल्याने त्या झाडांची मुळे खोलवर गेलेली आहेत. त्यातून धरणाचे पाणी वाहून जात आहे. या तलावातील पाण्याच्या साठ्यामुळे सुंदरभाटले, कलानगर, गिरपवाडी, गावडेवाडी, नांदोसकरवाडी, विठ्ठलवाडी. राजवाडा, दाभोसवाडा येथील पिण्याच्या पाण्याचा नैसर्गिक रित्या पुरवठा अनेक वर्षापासून या भागातील विहिरींना होत असतो. गेल्या कांही वर्षापासून या तलावात पाणीसाठा रहात नसल्याने उन्हाळी पाणी टंचाई निर्माण होते. चालू वर्षी वेंगुर्ले शहरात या परीसरातील कांही भागात निर्माण झालेली उन्हाळी पाणी टंचाई व नागरिकांकडून होत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येची माहिती व नागरिकांची पाण्याची मागणीबाबतची माहिती दिपक केसरकर यांना समजली.  त्यांनी केलेल्या सुचनेनुसार, दिपक केसरकर यांच्या सौजन्याने शिवसेनेचे वेंगुर्ले शहर प्रमुख उमेश येरम यांच्या नियोजनाखाली शिवसेना पक्षातर्फे मान्सूनचा पाऊस सुरु होईपर्यंत पाणी पुरवठा करण्यात आला. त्यामुळे  नारायण तलावाच्या कामाची अत्यावश्यकता स्पष्ट होत आहे. त्यामुळे या तलावाची दक्षिणेकडील बंधारा कम भिंत नवीन बांधणे व इतर डागडुजी व तसेच अनेक वर्षे साचलेला तलावातील गाळ काढण्याबाबतची मागणी ९ वाडयातील सुमारे ४०० घरांकडून शिवसेनेचे वेंगुर्ला शहर प्रमुख उमेश येरम यांचेकडे करण्यात आलेली होती. शहरातील नागरिकांच्या या अत्यावश्यक व जीवनावश्यक कामाची दखल घेत सदरचे काम तातडीने व्हावे, या करीता निधी उपलब्द करून द्यावा अशी मागणी शिवसनेचे वेंगुर्ले शहर  प्रमुख उमेश येरम व जिल्हा संघटक सचिन वालावलकर यांनी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री तथा स्थानिक आमदार दिपक केसरकर यांचेकडे केली आहे.