
सावंतवाडी : ऐन पावसाळा तोंडावर असताना सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यातील महावितरणचे विजवाहक खांब गंजलेले आहेत. यातून मानवी जीवाला धोका तसेच आपत्ती निर्माण होऊ शकते. या अनुषंगाने विजवाहक खांब बदलावेत आणि त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी केली.
महावितरणचे अधिकारी तसेच भारतीय जनता पक्ष पदाधिकारी आणि स्थानिक जनतेच्या वतीने यावर तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी या बैठकीला उपस्थित राहून विशाल परब यांनी वारंवार होणारा विस्कळीत वीज पुरवठा, सर्वसामान्यांच्या तक्रारी आणि महावितरण चा भोंगळ कारभार याबाबत तीव्र निषेध नोंदविला. आपल्या कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. अनेकदा पावसामुळे वीजपुरवठा खंडित होऊन असंख्य प्रश्नांना तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर महावितरणने तात्काळ वीजवाहक खांब दुरुस्ती तसेच बदलण्याच्या दृष्टीने काम करावे", अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी केली आहे.